Sunday, November 1, 2026
HomeनाशिकNashik News : गोदावरीत ऑक्सिजन 'शून्य'; नदी जैविक दृष्ट्या 'मृत' झाल्याचा प्रदूषण...

Nashik News : गोदावरीत ऑक्सिजन ‘शून्य’; नदी जैविक दृष्ट्या ‘मृत’ झाल्याचा प्रदूषण मंडळाचा अहवाल

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळयापासून कुंभमेळ्याचा आरंभ मानला जात असताना गोदावरी नदी जैविक दृष्ट्या पूर्णपणे ‘मृत’ झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून दिलेल्या अधिकृत प्रयोगशाळा अहवालात पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनची पातळी अक्षरशः ‘शून्य’ नोंदवली गेले आहे. नदीचे पात्र प्रक्रिया न केलेले सांडपाणी, मानवी विष्ठा आणि औद्योगिक रसायने वाहून नेणारे गटार बनल्याचे पर्यावरण तज्ञाचे मत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय प्रयोगशाळेने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोदावरी पात्रातील विविध ठिकाणांहून घेतलेल्या पाण्याचे नमुने तपासले. त्याचा अहवाल १९ ऑक्टोबर रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार, तपोवनातील (Tapovan) गोदावरी-कपिला संगम, दसक परिसर आणि टाकळी या तिन्ही मुख्य ठिकाणी विरघळलेला प्राणवायू पूर्णपणे शून्य आढळला आहे. 

तपोवन संगमावर प्रदूषणाचे तांडव; ‘बीओडी’ मर्यादेपेक्षा २८ पटीने अधिक

अहवालानुसार, तपोवनातील गोदावरी व कपिला नदीच्या संगमावर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड तब्बल ८५.० मिलीग्रॅम प्रतिलिटर इतकी नोंदवली गेली आहे. नदीच्या पाण्यासाठी सुरक्षित मानली जाणारी मर्यादा ३ मिलीग्रॅम प्रतिलिटरपेक्षा कमी असताना, ही पातळी सुरक्षित मानकांपेक्षा २८ पटीने जास्त आढळली आहे. याशिवाय, दसक परिसरात ‘बीओडी’ ५२.० मिलीग्रॅम प्रतिलिटर तर टाकळी परिसरात १७.० मिलीग्रॅम प्रतिलिटर इतकी घातक नोंद झाली आहे. 

घातक रसायने आणि मानवी विष्ठेचा पूर

पाण्यात औद्योगिक रसायनांचे प्रमाण दर्शवणारी केमिकल ऑक्सिजन डिमांड तपोवन संगमावर तब्बल १९६ मिलीग्रॅम प्रतिलिटर आणि दसक परिसरात १४० मिलीग्रॅम प्रतिलिटर इतकी घातक आढळली आहे. याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, पाण्यात मानवी विष्ठेचे प्रमाण दर्शवणारे फिकल कॉलिफॉर्म तपोवन येथे ७० एमपीएन /१०० एमएल तर संपूर्ण कॉलिफॉर्म २८० एमपीएन/१०० एमएल इतके भयानक नोंदवले गेले आहे. प्रक्रिया न केलेले मलमूत्र थेट पात्रात मिसळत असल्याने पाण्यात ई-कोलायसारख्या घातक जिवाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.

भाविकांच्या आरोग्याशी खेळ; त्वचारोग व साथीच्या रोगांचा धोका

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गोदावरीच्या पात्रात पवित्र स्नान व आचमन करण्यासाठी येत असतात. मात्र, सध्याच्या स्थितीतील पाणी स्नानासाठीही अत्यंत घातक बनले आहे. अशा दूषित पाण्यात उतरल्यास त्वचारोग, टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो आणि यकृताचे गंभीर संसर्गजन्य आजार उद्भवण्याचा तीव्र धोका निर्माण झाला आहे. नदी संवर्धन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नाशिक महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. या गंभीर परिस्थितीबाबत पर्यावरण कार्यकर्ते राजेश पंडित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या गोदावरी नदी प्रदूषण याचिकेवर येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी तातडीची सुनावणी होणार असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा संपूर्ण अधिकृत अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे. 

राजेश पंडित याचिकाकर्ते 

प्राणवायू शून्य होणे हा नदीच्या संपूर्ण जैविक मृत्यूचा पुरावा असून यात मासे किंवा कोणताही जलचर जिवंत राहणे अशक्य आहे.

प्रविण शिलावट, पर्यावरण प्रेमी

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला सर्वाधिक 5000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 2084...