पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
म्हसरूळ परिसरातील कुलकर्णी फार्मसमोर बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रिक्षा आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत रिक्षा उलटल्याने त्यातील ग्लोबल कॉलेजच्या सात ते आठ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यापैकी तिघींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अमरेश पंडित (३४) हे आळंदी कॅनलकडून म्हसरूळकडे प्रवासी घेऊन जात होते. त्याचवेळी नाशिकहून दिंडोरीकडे जाणाऱ्या श्यामलाल शर्मा (२५) यांच्या दुचाकीची रिक्षाशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात गस्त घालत असलेल्या महिला पोलीस अंमलदार सुवर्णा राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थिनींना त्वरित खासगी रुग्णालयात हलवून उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात अशिका गांगुर्डे, अर्चना चौरे, भूमिका हवल्या, वैशाली धानगुडे, योगिता वाढू, वासल खरबत आणि वैतरणा खरबत या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. रिक्षा पलटी झाल्याने त्यांच्या डोक्याला, छातीला आणि कमरेला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यापैकी तिघींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणाची माहिती दीपक सोनवणे यांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरू आहे.




