Friday, June 19, 2026
HomeनाशिकNashik News : तोटा लालपरीचा, धंदा खाजगीचा! एसटीची धडक मोहीम; आरटीओ आणि...

Nashik News : तोटा लालपरीचा, धंदा खाजगीचा! एसटीची धडक मोहीम; आरटीओ आणि पोलिसांची दोन दिवसांत अवघ्या १३ वाहनांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashk

राज्य परिवहन महामंडळाचा (एस.टी.) गाडा दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत रुतत चालला आहे. वर्षानुवर्षे डोळ्यांदेखत सुरू असणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीने लालपरीचे रक्त शोषून घेतले, तेव्हा कुठे ढिम्म प्रशासनाला जाग आली आहे. महामंडळाचा तोटा जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे गेला, तेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांच्या बैठकीनंतर सूत्रे फिरली आहेत. 

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या आदेशाने ४ ते १५ जून दरम्यान बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ आणि अवैध वाहतूक विरोधी धडक मोहीम सुरू झाली आहे. पण “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” सहन करणाऱ्या एस.टी.ला वाचवण्यासाठी ही मोहीम पुरेशी आहे का, की हा केवळ १५ दिवसांचा फार्स आहे? हा खरा प्रश्न आहे. नाशिकमध्ये (Nashik) वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे आणि विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली नवीन मध्यवर्ती बसस्थानक, मेळा स्थानक, महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख आगारांमध्ये आरटीओ आणि पोलिसांच्या (RTO and Police) मदतीने कारवाई सुरू झाली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड आणि मोटर वाहन निरीक्षक माधुरी सोनार यांनी दोन दिवसांत अवघ्या १३ वाहनांवर कारवाई केली. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, प्रशासनाला कारवाई (Action) करण्यासाठी मंत्र्यांच्या बैठकीची आणि विशेष मोहिमेची वाट का पाहावी लागते? जर ही कारवाई कायदेशीर आणि अनिवार्य आहे, तर ती केवळ १५ जूनपर्यंतच का? १६ जून उजाडताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होणार नाही कशावरून? असे अनेक प्रश्न यानिनित्ताने उपस्थित केले जात आहेत. एसटीला जर खरोखरच तोट्यातून बाहेर काढायचे असेल, तर अशा १५ दिवसांच्या ‘इव्हेंट’वजा मोहिमांऐवजी वर्षभर सातत्यपूर्ण कारवाई करणारी यंत्रणा हवी, असे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे. 

विळखा पांढऱ्या नंबरप्लेटचा, बळी ‘लालपरी’चा!

​नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, मालेगाव, मनमाड यांसारख्या प्रमुख स्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वारावरच खाजगी ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी आणि छुप्या पद्धतीने चालणारी पांढऱ्या नंबरप्लेटची वाहने प्रवाशांची पळवापळवी करतात. हे चित्र प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक पोलिसांना रोज उघड्या डोळ्यांनी दिसते.

उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पोलिस व आरटीओच्या मदतीने २०० मीटर नो पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

भगवान घुगे, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी, रा.प. नाशिक विभाग

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...