सप्तशृंगीगड | वार्ताहर | Sapthshurngi Gad
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणारा रस्ता (Road) तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्तशृंगगड ते नांदुरी या घाटमार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचा अधिकृत आदेश कळवणच्या (Kalwan) उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
काँक्रिटीकरणाचे काम आणि सुरक्षिततेचा निर्णय
सप्तशृंगगड–नांदुरी घाटमार्गावर (Saptashrunggad-Nanduri Ghat ) सध्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वाहतूक सुरू ठेवून काम केल्यास ते पूर्ण क्षमतेने आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच घाटातील अपघातांचा धोका टाळून भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंदिर खुले; पायी मार्ग आणि अत्यावश्यक सेवांना सूट
वाहनांची वाहतूक बंद असली तरी देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने सोयी-सुविधा आणि सवलती लागू ठेवल्या आहेत. त्यानुसार तीनही दिवस श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमित वेळेत खुले राहील.नांदुरी ते सप्तशृंगगड जाणाऱ्या पायी मार्गावरून भाविकांना नेहमीप्रमाणे प्रवास करता येईल. तसेच रुग्णवाहिका (Ambulance), अत्यावश्यक सेवांची वाहने आणि स्कूल बस यांना या रस्ताबंदीमधून सूट देण्यात आली आहे.
प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन
या तीन दिवसांत गडावर येणाऱ्या भाविकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.गडावर दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक आणि प्रवाशांनी या ३ दिवसांच्या रस्ताबंदीच्या आदेशाची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




