नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य सरकारने (State Government) लागू केलेल्या १५ टक्के एसटी दरवाढीविरोधात (ST Ticket Price Hike) शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) आक्रमक पवित्रा घेत ही दरवाढ रद्द व्हावी, या मागणीसाठी ठक्कर बाजार व नवीन सीबीएस बसस्थानकासमोर तीव्र चक्काजाम आंदोलन (Agitation) केल्याने दीर्घकाळ एसटी बस वाहतूक ठप्प झाली होती. बसस्थानकातून जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस रोखून धरल्याने प्रवाशांचेही अतोनात हाल झाले. दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना दिला.
लालपरी (एसटी) ही सर्वसामान्यांची जीवन वाहिनी आहे,आधीच अनेक लालपरींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्त्यात (Road) कुठेही त्या ब्रेकडाऊन होऊन पडतात असे असले तरी प्रवासासाठी सर्वसामान्य जनता लाल परीचाच आधार घेतात. प्रवाशांना (Passengers) चांगले चांगले सेवा देणे तर सोडा परंतु काही आर्थिक संकट आले की कर भाडेवाढ असा सिलसिला शासनातर्फे सुरू आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने तोटा होतो याची जाणीव असतानासुद्धा त्याला आळा घालण्याऐवजी भाडेवाढ करायची हा कुठला न्याय. महागाईने कळस घातल्याने लोक आधीच त्रस्त आहेत. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे छुप्या पद्धतीने दुसऱ्या मार्गाने काढून घेण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही,असे जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी बोलताना नमूद केले.
यावेळी ‘परिवहनमंत्री हाय हाय’, ‘रद्द करा रद्द करा एसटी भाडेवाढ रद्द करा’,’एसटी महामंडळाचा भ्रष्टाचार कमी करा’,’दादागिरी नही चलेगी नही चलेगी’, ‘शिवसेना ठाकरे गट जिंदाबाद जिंदाबाद’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिक इतके आक्रमक झाले होते की काहींनी तर बसच्या टपावर जाऊन घोषणाबाजी केली. नंतर एन.डी.पटेल रोडवरील विभागीय कार्यालयात (Office) जाऊन बस दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन विभागीय नियंत्रकांना सादर करण्यात आले.
दरम्यान, या चक्काजाम आंदोलनात सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, माजी आमदार वंसत गिते, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, महेश बडवे, सचिन मराठे, मामा राजवाडे, दिलीप मोरे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, महानगर संघटक सचिन बांडे, यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.