पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्याविरोधात नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही व्यक्तींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघासह विविध संघटनांच्या वतीने आज (शुक्रवारी) पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) निवेदन देण्यात आले.
इतिहासाचा विपर्यास खपवून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असताना, धीरेंद्र शास्त्री आणि आनंद स्वरूप यांनी इतिहासाचा विपर्यास करून महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. हा प्रकार भावी पिढीची दिशाभूल करणारा असून अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती “महाराजांचा अवमान करणाऱ्या विधानांमुळे (Statement) शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर अशा वक्तव्यांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर गुन्हे (Case) दाखल करावेत,” अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
विविध संघटनांची वज्रमुठ निवेदन देतेवेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांच्यासह राजेंद्र शेळके, वैभव वडजे, रमेश खापरे, ॲड. गौरव गाजरे, संदीप हांडगे, सागर कातड, हिरामण वाघ, विशाल वारुळे, हार्दिक निगल, महेंद्र बेहेरे, गणेश पाटील, प्रमिला पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




