नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर (Mahapalika Election Result) येणाऱ्या यंदाच्या रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, नाशिक पोलिसांनी (Nashik Police) टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. उत्सवात महिलांची छेड काढणाऱ्या किंवा धिंगाणा घालणाऱ्यांची रंगपंचमी यंदा पोलीस ठाण्यात साजरी होण्याची चिन्हे आहेत. विनापरवानगी सेलिब्रेशन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि सुधाकर सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पथकाने जुने नाशिक व पंचवटी परिसरातील (Nashik and Panchvati Area) रहाडींची पाहणी केली. तिवंधा चौक, शनी चौक, मधली होळी आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा यांसारख्या संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेऊन बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
यंदा केवळ साध्या वेशातील पोलीसच नव्हे, तर दामिनी मार्शल आणि निर्भया पथक शहरात तैनात असेल. पाण्याचे फुगे मारणे, अश्लील शेरेबाजी करणे किंवा नशेत गोंधळ घालणाऱ्यांना जागीच ‘चोप’ दिला जाईल. गर्दीचा फायदा घेऊन छेडछाड करणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्यात (Police Station) नेऊन कठोर कारवाई केली जाणार आहे.
आयोजकांसाठी नियमावली
- रहाड आणि ‘शॉवर डान्स’च्या ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी बॅरकेडिंग बंधनकारक.
- रहाडीत एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग ठेवावा.
- डीजे वाजवण्यास मनाई असून मर्यादित आवाजातच साउंड सिस्टम लावता येईल.
- गेल्या वर्षी वाद झालेल्या मंडळांना तंबी देण्यात आली असून, सराईतांवर तडीपारीची कारवाई सुरू.




