सिन्नर | प्रतिनिधी
शहरालगत बिबट्याचा वावर वाढला असून दोन दिवासंपूर्वीच शहरालगत असणाऱ्या ढग्ऱ्या डोंगरावरील पाणवठ्याजवळ बिबट्यांच्या जोडीचे ठसे आढळून आल्याने परिसरात फिरायला जाणाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आढळून आलेल्या पावलांच्या ठशांवरून परिसरात बिबट्यांची जोडी मुक्त संचार करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ढग्या डोंगर हा निसर्गसंपदेने वेढलेला परिसर असून या भागात नेहमीच वन्यजीवांचा मुक्त संचार बघायला मिळतो. ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ढग्या डोंगरावर वृक्ष लावण्याबराबेरच त्यांच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवले जात असतात. त्यासाठी दररोज सकाळी समितीचे कार्यकर्ते न चुकता डोंगरावर जातात. डोंगरावर लावलेल्या वृक्षांना उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वीच समितीच्या वतीने श्रमदानातून छोटे पाणवठेही तयार करण्यात आले आहेत. त्यावर कधी-कधी वन्यजीवही पाणी पिण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे समितीचे कार्यकर्ते ढग्या डोंगरावर गेले असता अशाच एका पाणवठ्याजवळ बिबट्याच्या जोडीचे ठसे त्यांना आढळून आले. दिवस उजाडल्यामुळे अथवा माणसांचा वावर वाढल्याची चाहूल लागल्याने ही बिबट्याची जोडी डोंगर कपारीला जाऊन लपल्याची शक्यता नाकारता येत नाही या भागात मोरांची संख्या मोठी असून तरस व अन्य वन्यजीवही यापूर्वी आढळून आले होते. मात्र बिबटे पहिल्यांदाच दिसल्याचे ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
फिरणाऱ्यांनी काळजी घ्यावी
शहरापासून ढग्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत दररोज सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या सिन्नरकरांची संख्या मोठी आहे. आज बिबट्याची पावले दिसली आहेत. उद्या प्रत्यक्ष बिबटेही दिसू शकतात. त्यामुळे फिरायला येणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहान ढग्या डोंगर संवर्धन समितीचे सदस्य सुरेंद्र क्षत्रिय यांनी केले.