नाशिक | Nashik
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या राजीनाम्याभोवती रंगलेले राजकीय नाट्य अद्याप शमलेले नाही. केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रदेश नेतृत्वाने त्यावर नेमका काय निर्णय घेतला, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. परिणामी शहर भाजपमध्ये (BJP) सध्या संभ्रमाचे वातावरण असून, राजीनामा स्वीकारला जाणार की नेतृत्व बदल होणार? याकडे कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Corporation) पार्श्वभूमीवर नाशिक शहराध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाकडून अंतिम निर्णय होण्यापूर्वीच या पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्रदेश स्तरावरून अंतिम निर्णय होईपर्यंत सुनील केदार हेच शहराध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्याकडेच संघटनात्मक जबाबदारी कायम राहणार का? याबाबत पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पालकमंत्री गिरीश महाजनांच्या पसंतीचा चेहरा?
नव्या शहराध्यक्षाच्या निवडीवरून भाजपच्या (BJP) वर्तुळात विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीतील किंवा पसंतीचा उमेदवार शहराध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शहर संघटनेची सूत्रे कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय घेताना पक्षातील अंतर्गत गटबाजी, संघटनात्मक पकड आणि निवडणुकीची राजकीय समीकरणे विचारात घेतली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा बदल केवळ संघटनात्मक न राहता, आगामी काळातील नाशिक भाजपाची (Nashik BJP) दिशा ठरवणारा ठरेल, असे मानले जात आहे.
इच्छुकांची नावे चर्चेत; प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयाकडे डोळे
शहराध्यक्षपदासाठी उत्तम उगले, सुनील अडके, नाना शिलेदार, अनिल भालेराव, देवदत्त जोशी यांच्यासह काही इतर पदाधिकारीही इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. इच्छुकांनी आपापल्या स्तरावर वरिष्ठांशी संपर्क वाढवला असला, तरी अंतिम निर्णय प्रदेश नेतृत्वाच्या हाती आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणाचा वरचष्मा राहतो आणि पक्ष नेमका कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतो, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सध्या नाशिक भाजपमध्ये ‘राजीनामा कायम राहणार की नेतृत्व बदल होणार? आणि ‘नवा शहराध्यक्ष कोण?’ या दोन प्रमुख प्रश्नांवरच जोरदार चर्चा सुरू आहे.




