नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिवाळीचा सण पूर्णत: सुरू होण्यापूर्वीच आणि फटाक्यांची आतषबाजी होण्याआधीच नाशिक शहराच्या (Nashik City) हवेने गंभीर वळण घेतले आहे. अवघ्या सहा दिवसांत शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ८९ वरून थेट १५८ पर्यंत पोहोचला असून, नाशिककरांना सध्या मध्यम श्रेणीतील प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे. यंदा फटाक्यांचा धूर उठण्याआधीच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांच्या धुळीने हवेची वाट लावली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबर रोजी नाशिकची हवा चांगली (एक्यूआय- ८९) नोंदवली गेली होती. मात्र, ७ नोव्हेंबरपर्यंत हा निर्देशांक १५८ वर गेल्याने हवा मध्यम श्रेणीत घसरली आहे. विशेष म्हणजे वसुबारस आणि धनत्रयोदशी या दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत शहरातील फटाक्यांचा आवाज आणि आतषबाजी तुलनेने नियंत्रणात होती. तसेच दिवाळी सणामुळे बहुतांश औद्योगिक वसाहतींमधील कारखाने बंद असल्याने औद्योगिक उत्सर्जनाचा ताणही कमी आहे.
औद्योगिक प्रदूषण आणि फटाक्यांचा प्रभाव कमी असतानाही हवेची गुणवत्ता खालावण्यामागे शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सुरू असलेली खोदकामे आणि त्यामुळे उडणारे धुलिकण मुख्य कारण ठरत आहेत. फटाक्यांची खरी आतषबाजी लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी होणार असल्याने, या दिवसांनंतर शहराच्या हवेची स्थिती अधिक चिंताजनक होण्याची भिती आहे.
५ ठिकाणी मोजणी
शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणावर (Noise Pollution) लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मोक्याच्या ५ प्रमुख ठिकाणी फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजाची मोजणी केली जात आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचा डेटा एकत्र करून पाडव्यानंतर सविस्तर अहवाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांनी मर्यादित आवाजात सण साजरा केला की ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडली, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.
विक्रेत्यांचा दावा कागदावरच?
यंदा बाजारात कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे ग्रीन फटाके अर्थात पर्यावरणपूरक फटाके उपलब्ध असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. मात्र, फटाक्यांची आतषबाजी वाढल्यानंतर हवा आणि ध्वनिप्रदूषणात कितपत वाढ होते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.




