नाशिक | भारत पगारे | Nashik
महाराष्ट्र (Maharashtra) हा देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४ हजार ५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्यास्थानी आहे. तरीही राज्याने एकूण ५४. ४७ चौरस कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे. दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या वनाच्छादनात (Forest Cover) मागील चार वर्षामध्ये २५.०४ चौ. किमी. ने वाढ झाली आहे. सन २०२१ साली अवधी ३. २१ चौरस किमी इतकी वाढ झाली होती.
नाशिकसाठी (Nashik) ही दिलासादायक बाब असली तरीदेखील घनवन व मध्यम घनवन मात्र घटले आहे. त्यातच, नाशिक वन्यजीव विभागांतर्गत (Nashik Wildlife Department) असलेले नांदूरमध्यमेश्वर, कळसूबाई हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्याचा वन्यजीव क्षेत्रातील वनाच्छादन आश्चर्यकारकरित्या २.१२ चौरस किमीने घटले आहे. नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता वनहद्दीतील नैसर्गिक संपत्तीपैकी वनाच्छादन क्षेत्र वाढते आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेने २०२३चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल नाशिकसाठी काहीसा दिलासादायक तर काहीसा चिंताजनक आहे.
वनाच्छादनाच्या क्षेत्रात एकूण वाढ दिसत असली तरी तुलनेने मात्र घनदाट वनाच्छादन हे अजूनही शून्यावर आहे.तसेच मध्यम घनदाट जंगलाचे क्षेत्रदेखील मागील चार वर्षात सुमारे ४० चौ. किमीने घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर खुल्या वनाच्छादनात ७५ चौ. किमीने वाढ झाली आहे. खुरटे (झुडूपवर्गीय) वन क्षेत्रदेखील सुमारे ६० चौ. किमीने घटले आहे. यामुळे नाशिककरांना (Nashik) पुढील पाच वर्षे वनाच्छादनाचे क्षेत्र वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यात परत एकदा मोठ्या प्रमाणात वृक्षसंरक्षण व संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. जोपर्यंत प्रभावी वनीकरण व संवर्धन होत नाही, तोपर्यंत वनाच्छादनाचा टक्का वाढणे अशक्य आहे.
पूर्व आणि पश्चिम भाग
पूर्वमध्ये ३.३२ चौ. किमी वनाच्छादन वाढले असून या भागातील एकूण ७,०८४.५७ चौ. किमी क्षेत्रापैकी ०.१७चौ. किमी घनवन, खुले वन २७९.६६ चौ. किमी इतके आहे. झुडूपवर्गी आच्छादन ८९.३२ चौ. किमी इतके असून सरासरी ३.३२ चौ. किमीने वनाच्छादनात वाढ झाली आहे. सोबतच, पश्चिममध्ये ८.०५ चौरस किलोमीटरची भर पडली असून पश्चिम वन विभागाचे एकूण ५,२०२.८८ चौ. किमी इतके क्षेत्रफळ आहे. यामध्ये मध्यम वनाच्छादन १६५.२० चौ. किमी इतके तर खुले वन ४२७.८७ चौ. किमी इतके आहे. झुडूपवर्गीय आच्छादन १३०.४२ चौ. किमी इतके आहे. मागील चार वर्षांपासून सरासरी ८.०५ वनाच्छादनात वाढ झाली आहे.
अहवालातून उघड
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अभयारण्याचा एकूण ७१६.८२ चौ. किमी इतके क्षेत्र असून त्यापैकी १७.४३ चौ. किमी इतके घनवन, ११७.१८ मध्यम घनवन, १५१.३७खुले वनाच्छादन आणि १८.०९ चौ. किमी झुडूपवर्गीय वनाच्छादन आहे. मागील चार वर्षात सरासरी २.१२ चौ. किमीने वनाच्छादन कमी झाल्याचे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने अहवालात म्हटले आहे.
शंकेला वाव!
गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी लाखो झाडे तोडली गेली, पण योग्य प्रमाणात व आदेशानंतरही वृक्षारोपण व पुनर्रोपन केल्याचे दिसत नाही. नाशिक-पुणे मार्गावर तब्बल ४० हजार झाडे लावण्यास संबंधितांना एनजीटीने नुकतेच आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली नसून वरील वृक्षाच्छादनात वाढ झाल्याच्या दाव्यावर शंका निर्माण होत असल्याचे वनप्रेमींनी म्हटले आहे.