Sunday, October 4, 2026
HomeनाशिकNashik News : रस्ते, नाले अन् नदीपात्रात राडारोडा टाकणे आता गुन्हा; महापालिकेचा...

Nashik News : रस्ते, नाले अन् नदीपात्रात राडारोडा टाकणे आता गुन्हा; महापालिकेचा इशारा

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणाऱ्यांवरही होणार कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील रस्ते, मोकळे भूखंड, नाले आणि नदीपात्रात अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांना आता चांगलीच चपराक बसणार आहे. बांधकाम व पाडकामातून निर्माण होणारा मलबा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास तो उचलण्यासाठी महापालिकेला (Mahapalika) येणाऱ्या खर्चाच्या तब्बल दहापट रक्कम संबंधितांकडून दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची शहरात कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकामाच्या ठिकाणी निर्माण होणारा राडारोडा रस्ते, पदपथ, नाले, मोकळ्या जागा अथवा नदीपात्रात टाकण्यास मनाई आहे. महापालिकेच्या अधिकृत यंत्रणेमार्फत राडारोडा उचलून नेण्यासाठी प्रतिटन ८०० रुपये वाहतूक शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, अनधिकृतपणे राडारोडा टाकताना आढळल्यास तो हटविण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या दहापट रक्कम दंडात्मक स्वरूपात वसूल केली जाणार आहे.

कचरा जाळणेही महागात

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासोबतच पालापाचोळा, प्लास्टिक किंवा अन्य कचरा जाळणाऱ्यांवरही कारवाई (Action) केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा जाळल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १० हजार रुपये दंड, तर कचऱ्याचे विलगीकरण न केल्यास प्रकारानुसार ३०० ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

चार प्रकारांत कचरा विलगीकरण बंधनकारक

नागरिक, संस्था आणि व्यावसायिकांनी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे (Garbage) ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनाही स्वतंत्र नियमांचे पालन करावे लागणार आहे.

प्लास्टिक वापरावरही कारवाई

प्रतिबंधित एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा (Plastic) तिसऱ्यांदा वापर केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा घाण करणे यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे

‘शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विशेषतः बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकून रस्ते आणि नाले अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे,’ असे आवाहन आयुक्त मनिषा खत्री यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...