नाशिक | Nashik
नाशिक तहसील कार्यालयाच्या ( Nashik Tehsil Office) हद्दीत वाहतूक पथकाने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या गौण खनिजाचा जाहीर लिलाव पूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या दिवशी रक्षाबंधन सणाची शासकीय सुट्टी असल्याने लिलावाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा लिलाव १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, नाशिक (Nashik) येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी दिली आहे.
लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज शुल्क रु. ५ हजार, अनामत रक्कम व लिलावाच्या अटी व शर्ती याबाबतचा सविस्तर तपशील तहसील कार्यालय, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक तसेच संबंधित संस्था यांनी सुधारित तारखेस लिलाव प्रक्रियेत बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले आहे.
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे. समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीसाठी ज्या नागरिकांना अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी समक्ष बैठकीच्या दिवशी तक्रार अर्ज सादर करावेत किंवा टपालाने सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नाशिक तथा पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक या पत्त्यावर पाठवावेत, असे भारत तांगडे, सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.



