Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik News : पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा; दोन महिन्यांत पस्तीस बाबा गजाआड

Nashik News : पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा; दोन महिन्यांत पस्तीस बाबा गजाआड

'अंनिस'चा दणका!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकसह महाराष्ट्राला (Maharashtra) हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) पापाचा घडा फुटून आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. या एका घटनेने राज्यातील अंधश्रद्धेच्या बाजाराविरुद्ध अशा काही ठिणग्या उडाल्या की, अवघ्या ६० दिवसांत पोलिसांनी (Police) संपूर्ण राज्यात तब्बल ३५ भोंदूबाबांचे ‘दरबार’ उधळून लावले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या सर्व गुन्ह्यांचे संकलन केले असून, या कारवाईमुळे पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात भोंदूगिरीचे पेव किती पसरले आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

- Advertisement -

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते, असा आरोप करणाऱ्या मानसिकतेला या कारवाईने चपराक दिली आहे. अटक करण्यात आलेल्या ३५ भोंदूबाबांच्या यादीवर नजर टाकल्यास, त्यात हिंदूधर्मीय बाबांसोबतच अब्दुल रशीद शेख, अल्ताफ रईस खान, इरफान नियाज अहमद, शाहिद शेख यांसारखे मुस्लीम मांत्रिक आणि अनिल सोलोमन सिंग यांच्यासारख्या खिश्चन पादरींचाही समावेश आहे. अंधश्रद्धा आणि वासनेचा कोणताही धर्म नसतो, हेच या कारवाईतून सिद्ध झाले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये धक्कादायक बाब अशी की, भोंदूगिरीचे हे जाळे केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित नसून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या हायटेक शहरांमध्येही घट्ट आहे. भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित महिला समोर येण्यास कचरत होत्या. मात्र, नाशिकच्या खरात प्रकरणानंतर पीडित महिलांमध्ये लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये (Case) महिलांना (Women) मानसिक भीती दाखवून त्यांची मोठी आर्थिक लूट करण्यात आली असून, काही ठिकाणी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचेही उघड झाले आहे.

कायदा आहे, पण अंमलबजावणी सुस्त

अंधश्रद्धेच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि ‘अंनिस’ने तब्बल १८ वर्षे संघर्ष केला. त्यानंतर २०१३ मध्ये ‘जादू‌टोणाविरोधी कायदा’ अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. मात्र, आज राज्याची स्थिती पाहता सरकार या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. सरकार सुस्त असले तरी ‘अंनिस’ने आपल्या मर्यादित क्षमतेत प्रबोधन आणि प्रचाराचा लढा सुरू ठेवल्यामुळेच ३५ गुन्हे दाखल झाल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

कारवाई झालेल्या प्रमुख भोंदूंची यादी

संशयित अशोक कुमार उर्फ कॅप्टन खरात (नाशिक), गडगेबाबा ऊर्फ राजेंद्र गडगे (संगमनेर), चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला), पंकज देवराम घोलप (येडगाव, पुणे), मोहन मामा भोसले (कुडूवाडी, सोलापूर), नाना बर्डे (आळे फाटा, पुणे), ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई), अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई), रिधम पांचाळ (मालाड, मुंबई), गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर), अर्जुन चव्हाण ऊर्फ टनटन बाबा, नवी मुंबई), विठोबा वाल्मीक जाट (सातपूर, नाशिक), किसन तळपे (मंदोशी, खेड), महेशगिरी ऊर्फ महेश काकडे (लासलगाव, नाशिक), अब्दुल रशीद शेख (खालापूर, रायगड), इरफान नियाज अहमद (कांदिवली, मुंबई), अनिल सोलोमन सिंग (पादरी) (पुणे), शिवराम पराश सावर (पालघर), अल्ताफ हसन मदारी, (जळगाव), नाना महाराज ऊर्फ गुरू माऊली वीरकर (टेंभुर्णी, सोलापूर), पिंटू धुमाळ (बारामती, पुणे), हेमदास किसन बावणे (अड्याळ, भंडारा), चंद्रकांत राजेंद्र माळी (इगतपुरी, नाशिक), अशोक मधुकर आढाव (श्रीरामपूर, अहिल्यानगर), औदुंबर गडदे (स्वारगेट, पुणे), नवनाथ गवळी (खेड, पुणे), शाहिद शेख, (खडकपाडा, कल्याण), शिव भाऊ सोनवणे (सर्जेपुरा, अहिल्यानगर), ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, (बिलोली, नांदेड), रमेश गुप्ता (मालाड, मुंबई), हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर, नांदेड), मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित (ठाणे), कृष्णा ऊर्फ भगत सुभाष चित्ते (पश्चिम देवपूर, धुळे), यशवंत एकनाथ थोरात (पारनेर, अहिल्यानगर) व श्याम महाराज राठोड (दिघी, पुणे).

या ३५ गुन्ह्यांवरून स्पष्ट होते की, ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही भोंदूगिरीचे जाळे पसरले आहे. सर्वच धर्मांतील भोंदूबाबांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दीड कोटींचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादींना परत; परिमंडळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंबड विभाग अंतर्गत (Ambad Division of Zone) येणाऱ्या अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे...