मानूर | पुनदखोरे | वार्ताहर
कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) कळवण खुर्द येथील एका आदिवासी तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाने भीषण वळण घेतले असून परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आदिवासी समाजाच्या (Tribal Community) शेकडो नागरिकांनी शनिवारी कळवण पोलीस ठाण्यावर (Kalwan Police Station) जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत दैनिक देशदूतचे पत्रकार दिपक सोनवणे जखमी झाले असून पोलीस ठाण्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण खुर्द गावातील विठोबा गुलाब पवार हा तरुण (दि. ०३ ऑक्टोबर) रोजी सकाळी अकरा वाजेपासून बेपत्ता आहे. या तरुणाला (Youth) गावातीलच एका शेतकऱ्याने मारहाण करून खून केल्याचा गंभीर आरोप संतप्त आदिवासी नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, अशी भावना समाजामध्ये पसरल्याने याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर बसून होते. यामुळे जवळपास सोळा तास वाहतूक ठप्प झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त पोलीस फौजफाटा तातडीने बोलावण्यात आला होता.
आज शनिवार (दि.०४) रोजी सकाळी आदिवासी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर ठिय्या मांडत आरोपींवर तातडीने गुन्हा (Case) दाखल करण्याची मागणी केली. मात्र, यास थोडा विलंब होत असल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस (Police) प्रशासनाने त्यास मज्जाव केला असता जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला पोलीस कर्मचारी व दैनिक देशदूतचे पत्रकार दिपक सोनवणे हे जखमी झाले आहेत. तसेच एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
कळवण तालुक्यात अशी घटना घडल्याची ही पहिलीच वेळ असून संतप्त जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांना तब्बल दहा तास वेठीस धरले होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी सुरुवातीस मिसिंग केस दाखल केली होती. परंतु, जमावाने संशयितांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केल्याने तणाव निर्माण झाला होता. आज सकाळपासून संतप्त नागरिकांनी अक्ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तसेच अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, व आमचा मुलगा २४ तासात आम्हाला मिळावा अशा प्रकारच्या मागण्या केल्या त्या अनुषंगाने संबंधित शेतकरी पिता पुत्रावर अक्ट्रॉसिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण कळवण तालुक्यात चर्चांना उधाण आले असून, प्रशासनाकडून (Administration) या प्रकरणाला गांभीर्याने घेतले गेले आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर करीत आहेत.




