Tuesday, September 15, 2026
HomeनाशिकNashik News : गंगापूर रोडवर झाडांची अनधिकृत छाटणी; काही झाडे बुडापर्यंत तोडली,...

Nashik News : गंगापूर रोडवर झाडांची अनधिकृत छाटणी; काही झाडे बुडापर्यंत तोडली, CCTV मध्ये छोटा हत्ती वाहन कैद

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची आयुक्त मनीषा खत्रींची माहिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर रोडवरील (Gangapur Road) काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी झाडांची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी झाडे (Tree) थेट बुडापर्यंत तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्यामध्ये एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाचे ‘छोटा हत्ती’ वाहन आढळून आले आहे.

- Advertisement -

शुक्रवार व शनिवारच्या मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेल या परिसरातील काही ठिकाणी झाडांची छाटणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या कारवाईसाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, काही झाडांची केवळ फांद्या छाटण्याऐवजी ती बुडापर्यंत तोडण्यात आल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेच्या (Mahapalika) संबंधित विभागाकडून पाहणी करण्यात आली. या प्रकरणातील संबंधित इसमांचे सीसीटीव्ही फुटेजही प्रशासनाला मिळाले आहे. फुटेजमध्ये एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन दिसून येत असल्याने त्याच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दोषींवर गुन्हा दाखल करणार

‘गंगापूर रोडवरील काही ठिकाणी अज्ञात इसमांकडून झाडांची अनधिकृत छाटणी करण्यात आली असून, काही झाडे बुडापर्यंत तोडण्यात आली आहेत. या घटनेच्या अनुषंगाने संबंधित इसमांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. त्यामध्ये एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन निदर्शनास आले आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू असून, महापालिकेमार्फत लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी इसमांविरुद्ध नियमानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,’ अशी माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. शहरातील झाडांची अनधिकृत तोड अथवा छाटणी करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. त्यामुळे या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांपर्यंत प्रशासन कसे पोहोचते आणि त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजेच….; सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा जोरदार प्रतिवाद

0
मुंबई । Mumbai सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाचे, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला न्यायालयीन संग्राम आता अत्यंत निर्णायक वळणावर आला...