नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील (Nashik City) विभागीय उद्यान निरीक्षक यांच्यासह विभागप्रमुख म्हणून उद्यान अधिक्षकांचे ठेकेदाराच्या (Contractor) कामांवर नियंत्रण नसल्याने मनपा आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक शहरात मनपाची (NMC) मोठ्या प्रमाणात उद्याने व जॉगिंग ट्रॅक आहेत, मात्र, त्यांची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली असून सतत नागरिकांसह अनेक संस्था, वृक्षप्रेमी संघटना, ज्येष्ठ नागरिक व जॉगर्स मनपाकडे तक्रारी करतात. शहरातील प्रमुख उद्यानांचा खाजगी मक्तेदारांना देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिलेला आहे, मात्र त्यांचेकडून अटीशर्तीनुसार नियमित कामे होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी नाराजी व्यक्त करुन उद्यान विभागाच्या कामात आठ दिवसात सुधारणा करण्याची तंबी दिली आहे.
शहरातील उद्यानांमधील (Parks) दुरावस्थेवरुन व त्याकडे उद्यान विभागाकडून केल्या जाणाऱ्या दूर्लक्षावरुन नाशिक महापालिकेच्या आयुक्त खत्री यांनी उद्यान विभागाच्या कारभाराची दखल घेत विशेष परिपत्रक काढून उद्यान विभागाला आठ दिवसात कारभार सुधारण्याचा अल्टीमेटम दिला आहे. आयुक्तांनी म्हटले की, शहरातील अनेक उद्यानांमध्ये व जॉगिंग ट्रॅकवर झाडांना वेळेवर व पुरेसे पाणी न दिल्याने शोभेची झाडे, लॉन्स सुकलेली आहे. उद्यानांमधील शोभेची झाडे, लॉन्सची वेळेवर छाटणी केली जात नसल्याने अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त झाडांची वाढ झाल्याने उद्यानांमध्ये बकाल स्वरुप प्राप्त झालेले आहे.
अनेक उद्यानांमधील व जॉगिंग ट्रॅकवरील पालापाचोळा दररोज उचलला जात नाही, साफसफाई केली जात नाही. अनेक उद्यानांमधील पाथवे खराब झालेले आहे, अनेक पाथवेवरील फरशा, ब्लॉक निघालेले आहे. शहरातील उद्यानांची वाट लागल्याचे चित्र असून ठेके दारांवर उद्यान अधिक्षकांसह कुणाचेही नियंत्रण नाही. उद्यानांमधील व जॉगींग ट्रॅकवरील शोभेची लाईटची तुटफूट झालेली आहे, लाईट बंद अवस्थेत आहे, त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. मोठ्या उद्यानांमध्ये वॉचमनची नेमणूक नसल्याने त्याठिकाणी नासधूस होत असून चोऱ्या देखील होत आहेत.
त्वरित काम सुधारा
उद्यान विभागाचे कामकाजामध्ये तात्काळ सुधारणा होणे आवश्यक आहे. याकरीता सर्व उद्याने व जॉगींग ट्रॅकचे प्रवेशद्वारावर दर्शनी भागात संबंधित विभागाचे निरीक्षक व उद्यान अधीक्षक यांचे नाव, संपर्क मोबाईल क्रमांक असलेले बोर्ड नागरिकांच्या सुचनांकरीता व संपर्काकरीता आठ दिवसाचे आत लावणेत यावे. तसेच उद्यान अधीक्षक यांनी सर्व उद्यान निरिक्षक यांना त्यांचे अधिपत्याखालील उद्याने व जॉगिंग ट्रॅक कामकाजाची व तेथील व्यवस्थेच्या सुधारणेकरीता कामाच्या वेळा निश्चित करून द्याव्यात व स्वतः सर्व विभागातील उद्याने व जॉगिंग ट्रॅकला नियमित भेटी देऊन तेथील व्यवस्था व सुधारणेची पाहणी करावी. यापुढे न चुकता उद्यानने साप्ताहिक अहवाल अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे सादर करावा. याची उद्यान विभागाने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे खत्री यांनी आदेशात म्हटले आहे.