नाशिक | Nashik
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय) लॅब अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडली असून यामुळे उद्योजकांचा (Entrepreneurs) संताप शिगेला पोहोचला आहे. हा प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ एका उद्घाटनासाठी कुलूपबंद ठेवण्यात आल्याने सरकारचा ढिसाळ कारभार आणि उद्योजकांबद्दलची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे. २०१२ साली नाशिकच्या (Nashik) सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांना मदत करण्यासाठी या लॅबचा पाया रचण्यात आला. तब्बल १३ वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला असून, त्याचा खर्च ११५ कोटींवरून २०० कोटींपर्यंत पोहोचला आहे.
या औद्योगिक वसाहतीत सुरुवातीला ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योग स्थापन झाले. त्यानंतर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही मोठी वाढ झाली असून, सध्या या भागात सुमारे ८०० लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत आहेत. स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या चाचणीसाठी अजूनही भोपाळ (Bhopal) किंवा बंगळुरूला जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि इतर उद्योजक संघटनांनी लॅब लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे, पण सरकारला (Government) त्याचे सोयरसुतक नाही. सीपीआरआय प्रशासनाने पुढील १०-१५ दिवसांत उद्घाटनाचा निर्णय होईल असे नेहमीप्रमाणेच सांगितले आहे. पण ही आश्वासने कितपत खरी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उद्योजकांचा संयम आता संपत आला आहे. सरकार यावर कधी गंभीरपणे विचार करणार आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका तोलमोल्या व्यक्तिमत्त्वासाठी
सीपीआरआय लॅबमध्ये अत्याधुनिक तपासणी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, बंगळुरूमधून तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारीही नियुक्त झाले आहेत, अगदी रस्त्याची कनेक्टिव्हिटी आणि अंतर्गत पायाभूत सुविधांच्या अडचणीही सोडवण्यात आल्या आहेत. सर्व काही तयार असतानाही केवळ एका तोलमोल्या व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. ही निव्वळ लालफितशाही आणि राजकीय उदासीनता नाही तर काय आहे?
सीपीआरआय लॅबमुळे उद्योजकांचे वाहतूक आणि प्रतीक्षेचे अनेक तास वाचणार आहेत. केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. गुजरात व मध्य प्रदेशातील उद्योजकदेखील येथे तपासणीसाठी येऊ शकतात. त्यामुळे ही सेवा लवकर सुरू करावी.
आशिष नहार, अध्यक्ष





