Friday, May 3, 2024
Homeनाशिकइगतपुरीत धरण उशाला कोरड घशाला; महाराष्ट्राच्या चेरापुंजीमध्ये जलसंकट

इगतपुरीत धरण उशाला कोरड घशाला; महाराष्ट्राच्या चेरापुंजीमध्ये जलसंकट

नाशिक | प्रतिनिधी

संपूर्ण जग एकीकडे करोनाशी दोन हात करत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत प्रचंड जलसंकट ओढवले आहे. येथील महिलांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचे संकट ओढवले आहे. येथील इंदूर, आंबेवाडी, वसली, चिंचले अशी ठिकाणी दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडूनही आता पाण्याची टंचाई निर्माण जाहली आहे. पाण्याच्या शोधात काही किलोमीटर चालत जावे लागते तर इगतपुरी शहरात चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्याला राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो. यामुळे तालुक्याची राज्यातील चेरापुंजी म्हणून ओळख आहे. गेल्या वर्षीदेखील येथील तहसीलमध्ये संपूर्ण राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे, या तालुक्यात सर्वाधिक धरणे आहेत. या धरणातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक अहमदनगरच नव्हे तर मराठवाड्यातही पाणी या धरणातून पुरविले जाते.

पण तरीही स्थानिकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत असून हक्काच्या तालुक्यातील पाणी मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. इगतपुरी नगरपरिषदेतील सत्ताधारी शिवसेनेने 18 महिन्यांत चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते पण त्याबाबत कोणतेही पाऊल अद्याप उचलण्यात आलेले दिसत नाही.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात, पिकांना आधार देण्यासाठी नागरिकांना बैलगाडीवर पाणी आणावे लागत आहे. इतकेच नाही तर पाण्याबरोबर चारासुद्धा कमी पडतो आहे. एकीकडे प्रशासन, कोविड – १९ चे संक्रमण थांबविण्यासाठी वारंवार हात धुण्याचे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र प्यायलादेखील पाणी मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गावात टँकरचा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. आम्हाला आवलखेड गावातून प्रस्ताव आला आहे. पाण्याचा प्रश्‍न पडल्यास ग्रामस्थांना प्रस्ताव सादर करण्याची विनंती आम्ही करतो. आम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते करू.

अर्चना भाकड पगार, तहसीलदार.

- Advertisment -

ताज्या बातम्या