Wednesday, April 29, 2026
HomeनाशिकNashik News : महापालिकेचा मोठा शटडाऊन; नाशिकमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद,...

Nashik News : महापालिकेचा मोठा शटडाऊन; नाशिकमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकाच्या (Nashik Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत शहरात (City) मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा सुधारणा, सिंहस्थ प्राधान्य कामे तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी शनिवार (दि. ४ एप्रिल) व रविवार (दि. ५ एप्रिल २०२६) असे सलग दोन दिवस संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या शटडाऊनदरम्यान विविध विभागांमध्ये जलवाहिन्यांचे क्रॉस कनेक्शन, गळती दुरुस्ती, व्हॉल्व बदलणे, तसेच जलशुद्धीकरण केंद्रांवरील कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी (Citizen) पाण्याचा साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विभागनिहाय महत्त्वाची कामे

नाशिक पूर्व

कलानगर जलकुंभाशी ५०० मिमी गुरुत्ववाहिनी जोडणे, तसेच गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्रावर कामे हाती घेतली जाणार असून यासाठी सुमारे २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे.

नाशिक पश्चिम

त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे ३०० मिमी पाईपलाईन गळती दुरुस्ती व पी अँड टी कॉलनी येथे एअर व्हॉल्व बदलण्याची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी सुमारे १२ तास लागतील.

नाशिकरोड विभाग

गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रांवर ९०० मिमी व १२०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन, पंप इनलेट बदल आणि फ्लो मीटर बसविण्याची कामे होणार असून यासाठी सुमारे ३६ तासांचा कालावधी लागेल.

पंचवटी

पेठरोड परिसरात ६०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन, समर्थनगर जलकुंभ जोडणी आणि कुसुमाग्रज गार्डन परिसरात गळती दुरुस्ती अशी कामे सुमारे १८ तासांत पूर्ण केली जातील.

सातपूर

१२०० मिमी व ५०० मिमी व्यासाच्या पीएससी पाईपलाईनवरील विविध ठिकाणी गळती दुरुस्तीची पाच महत्त्वाची कामे केली जाणार असून सुमारे १२ तास लागतील.

नवीन नाशिक

महाराजा हॉटेल, पाथरडी फाटा, इंद्रनगरी, गोविंदनगर, भवानी माता टाकी आदी ठिकाणी गळती दुरुस्ती, व्हॉल्व बसविणे व क्रॉस कनेक्शन अशी एकूण नऊ कामे केली जाणार असून यासाठी अंदाजे १८ तास लागतील.

१५ वा वित्त आयोगांतर्गत कामे

गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान १८०० मिमी पाइपलाइन टाकणे, तसेच १७०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन अशी मोठी कामे हाती घेण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४८ तास लागतील.

सोमवारी कमी दाबाने पाणी

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शनिवार व रविवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

नागरिकांना आवाहन

या कालावधीत पाणीटंचाईचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

ममतादीदींचा पराभव करण्यासाठी मोदी-शाहांनी संपूर्ण यंत्रणा राबवली, संजय राऊतांचा घणाघात

0
मुंबई । Mumbai "निवडणुका जर रणांगणासारख्या लढवल्या जाणार असतील आणि त्यात लोकशाहीऐवजी केवळ दहशतीचा वापर होणार असेल, तर ही लोकशाहीची हत्या आहे," अशा शब्दांत शिवसेना...