Friday, October 23, 2026
HomeनाशिकNashik ZP News : सीईओ ओमकार पवार यांना एस. एस. गडकरी पुरस्कार...

Nashik ZP News : सीईओ ओमकार पवार यांना एस. एस. गडकरी पुरस्कार प्रदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांना आज प्रदान करण्यात आला. मंत्रालय अॅनेक्स, मुंबई येथील परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव स्वाधीन एस. क्षत्रिय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) राबविण्यात आलेल्या ‘नवचेतना’ अभियान आणि ‘पोषणदूत’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. समाजातील दुर्बल व गरजू घटकांची ओळख करून त्यांच्यापर्यंत उपलब्ध शासकीय योजना आणि सेवांचा प्रभावी समन्वय साधत प्रत्यक्ष परिणाम घडवून आणणे, हे या उपक्रमांचे वैशिष्ट्य आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा, निधी आणि योजनांचा एकत्रित वापर करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या अभिनव प्रशासकीय दृष्टिकोनातून या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

‘नवचेतना’ अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करून १ लाख ६ हजार महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत व मॅप करण्यात आली. त्यांच्या गरजेनुसार रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी त्यांना जोडण्यात आले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य व्याजदराने १ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले असून त्यातून सात पुनर्विवाह संपन्न झाले. तसेच सौभाग्य शपथपत्र या उपक्रमातून ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबतच्या असामाजिक प्रथा बंद करण्याबाबत ठराव केले आहेत.

शिक्षणाच्या क्षेत्रात ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण (Education) शिष्यवृत्ती, तर ३२२ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून १५ हजार ६ बालकांना दरमहा २ हजार २५० रुपये सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. प्रत्येक कुपोषित बालकाची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित करून बालकाचे वजन, औषधोपचार, लसीकरण, आहार तसेच कुटुंबाच्या अडचणींचा नियमित पाठपुरावा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत १ हजार ९५४ कुपोषित बालकांचे ट्रॅकिंग करण्यात आले असून त्यापैकी ९८४ बालके सामान्य स्थितीत पोहोचली आहेत. तसेच ६११ बालके तीव्र कुपोषणाच्या स्थितीतून बाहेर आली आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक उत्तरदायित्वातून बालकांचा पाठपुरावा करण्यात आला.

महिला सक्षमीकरण, बालपोषण आणि शिक्षण या क्षेत्रातील या उपक्रमांमध्ये सर्वेक्षण, लक्ष्यित लाभ, वैयक्तिक उत्तरदायित्व, विभागीय समन्वय आणि नियमित पाठपुरावा या प्रशासकीय पद्धतींचा प्रभावी वापर करण्यात आला. या नाविन्यपूर्ण प्रशासकीय दृष्टिकोनाची दखल घेत ओमकार पवार यांना राज्यस्तरीय एस. एस. गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी, क्षेत्रीय यंत्रणा आणि या उपक्रमांच्या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांना समर्पित केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या (Government) योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामूहिक उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ ऑक्टोबर २०२६ – सामाजिक संघर्षाच्या मेळाव्यांची मांदियाळी

0
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दसरा मेळाव्यांना ऐतिहासिक महत्त्व असले, तरी यंदाचे मेळावे पारंपरिक शक्तिप्रदर्शनापेक्षा स्फोटक राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र ठरले. शिवसेना शिंदे आणि ठाकरे...