नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासकीय कार्यालयामध्ये (Government Office) कामकाजामध्ये गती येणेकरीता मुख्यमंत्री यांनी १०० दिवसाचा कार्यक्रम राबविणेबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (ZP CEO Ashima Mittal) यांनी सर्व जिल्हा व तालुका विभागप्रमुखांना ॲक्शन मोडमध्ये काम करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शुक्रवार (दि.१०) पासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून अभिलेखे वर्गीकरण करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सुचना दिल्या तसेच गटविकास अधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन तालुकास्तरीय व ग्रामपातळीवरील सर्व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये मोहीम स्वरुपात १०० दिवसांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
याबाबत जिल्हा परिषदेने परिपत्रक काढले असून त्यामध्ये प्रत्येक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातील नको असलेले जुने अभिलेखे यांची योग्य पद्धतीने वर्गीकरण करणे अभिलेख कक्ष अद्यावत करणे, कार्यालयात असलेले खराब / मोडके फनिचर बॉक्सेस यांचे तात्काळ कार्यालयातुन योग्य रितीने व्यवस्थापन करणे, कार्यालय स्वच्छ हवेशीर राहील याकरीता कार्यालयाची नियमितपणे स्वच्छता करणे, कार्यालयातील अधिकारी यांच्या नांवाचे फलक स्पष्ट व वाचनीय ठेवणे, कार्यालय प्रमुखांनी त्यांना भेटीस येणाऱ्या अभ्यांगतसाठी भेटीचा वेळ निश्चित करून तो प्रसिद्ध करणे, वेळेत कार्यालयात उपस्थित राहुन सर्व अभ्यांगताच्या भेटी घेवून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची बसण्यासाठी व्यवस्था करणे, सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नियमितपणे सुरू राहील याची दक्षता घेणे, कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता येण्याचे दृष्टीने कार्यालयातील सर्व कपाटांना क्रमांक देणे, कपाटावर संबंधित संकलन व कर्मचारी यांचया नावाचा फलक लावणे, कार्यालयात प्राप्त होणाऱ्या प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढून १०० दिवसांत शून्य करणे याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सर्व विभागांना कृती आराखड्यानुसार कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत पिण्याचे पाणी तसेच शौचालय दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. कार्यालय स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प