नाशिक | प्रतिनिधी
टीसीएस कंपनीतील तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा एजाज खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांची गुरुवारी (दि. ४) नाशिक पोलिस आयुक्तालयात तिसऱ्यांदा तब्बल पाच तास सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान निदा खानला मतिन पटेलनेच घराची चावी दिल्याची माहिती समोर आली असून, यामुळे पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त तथा एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांनी ही चौकशी केली. मतिन पटेल यांची ही तिसरी चौकशी होती. संशयित निदा एजाज खान आणि मतिन पटेल यांची ओळख कशी झाली? ती कोणी करून दिली? व त्या अनुषंगाने मुख्य प्रश्नांभोवती पोलिसांनी चौकशीचा फेरा आवळला होता. या महत्त्वाच्या प्रश्नांवर मतिनची पाच तास कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या ताशेऱ्याला तोंड देताना मतीनने तपासात काही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
व्हॉईस सॅम्पल ठरणार महत्त्वाचा दुवा
या गुंतागुंतीच्या प्रकरणात तांत्रिक पुरावे भक्कम करण्यासाठी पोलिसांनी सोमवारीच (दि. १) मतिन पटेल यांच्या आवाजाचे नमुने (व्हाईस सॅम्पल्स) घेतले आहेत. प्राथमिक तपासानुसार, निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित आश्रय मिळवून देण्यासाठी मतीनने तेथील घरमालक हनीफ याच्याशी फोनवर संपर्क साधला होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य दुवा मोबाईल फोन आधीच जप्त केला आहे. आता घेतलेले आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, हा अहवाल मतिन पटेल यांच्या गुन्ह्यातील सहभागावर शिक्कामोर्तब करणार की त्यांना दिलासा देणार, याकडे सर्वांचे लक्ष
व्हिडिओचे कनेक्शन काय ?
एकीकडे पोलिसांची एसआयटी चौकशी सुरू असतानाच, सोशल मीडियावर मतिन पटेल यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल आहे. व्हिडिओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत असतानाचा हा व्हिडिओ असून, याद्वारे मतीन यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाशी या व्हायरल व्हिडिओचा काही थेट संबंध आहे का, यादृष्टीने आता नाशिक पोलिस आणि सायबर शाखा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे.




