नाशिक | Nashik
महानगरपालिकेच्या पंचवटी विभागात (Panchvati Divison) कर वसुली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने सुमारे १७.६३ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जीवाला धोका; SIT चे न्यायालयाला पत्र, आजच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष जाधव याने १० सप्टेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची रक्कम थेट रोख स्वरूपात स्वीकारली. मात्र, ही रक्कम मनपाच्या खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःकडे ठेवून, त्या बदल्यात विविध भरणा केंद्रांवर स्वतःच्या बँक खात्याचे धनादेश जमा करून पावत्या घेतल्याचे उघड झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची तारांबळ
संबंधित धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादृत (बाऊन्स) झाले, अशी बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली आहे. या प्रकारामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले असून, करदात्यांचीही फसवणूक (Fraud) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सहाय्यक अधीक्षक उदय खैरनार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, भारतीय दंड विधानाच्या कलम ३१६ (४) व ३१८ (४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : पाटणकर टोळीचा पोलिसांनी केला ‘करेक्ट’ कार्यक्रम; सात जणांवर केली ‘ही’ कारवाई
दरम्यान, मनपा प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली असून, पुढील चौकशी सुरू आहे. मनपाने नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले आहे की, मालमत्ता कराचा भरणा हा केवळ अधिकृत भरणा केंद्रातच करावा. कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रक्कम देऊ नये आणि प्रत्येक व्यवहाराची अधिकृत पावती घ्यावी. अन्यथा झालेल्या नुकसानीसाठी मनपा जबाबदार राहणार नाही, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने पावणेपाच लाखांचा गंडा





