नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने शहरातील प्रमुख मार्ग, घाट रस्ते, वाहनतळ जोडणारे रस्ते व मुख्य चौक येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी अतिक्रमण विभागासह नगररचना व बांधकाम विभागाचे अधिकारीदेखील प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणार आहेत.
शहरात सध्या रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, घाट मार्ग विकास व बाहतूक सुधारणा यांसारखी महत्त्वाची कामे सुरू असल्याने मनपाच्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे आवश्यक झाले आहे. महापालिकेने यासाठी साधारण ४० महत्त्वाची ठिकाणे निश्चित केली असून त्यामध्ये मुंबई नाका ते मानवता हॉस्पिटल, सारडा सर्कल ते दामोदर टॉकीज, गंगापूररोड बारदान फाटा ते सुला चौक, सिटी सेंटर मॉल ते इंदिरानगर अंडरपास, त्र्यंबकरोड पपया नर्सरी ते एक्स्लो पॉईंट, नांदूर पूल ते जत्रा हॉटेल, खडकळी सिग्नल ते त्र्यंबक नाका आदी भागांचा समावेश आहे.
ही मोहीम चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात येणार असून, यासाठी अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग यांच्या संयुक्त पथकांसह विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जेसीबी, टक, कटर मशिन्स व इतर यंत्रसामग्री वापरण्यात येणार आहे.
या मोहिमेत विशेष म्हणजे मनपाच्या मालकीच्या जागांवर असलेली अनधिकृत दुकाने, शेड, टपऱ्या, भिंती, फलक व इतर बांधकामे काढण्यात येणार असून वाहतूक सुरळीत करणे व भाविकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मनपाने संबंधित नागरिकांना स्वयंस्फूर्तीन अतिक्रमण हटवण्याचे आवाहन केले असून, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. नागरिकांनी मनपाच्या जागांवरील अतिक्रमणे स्वतःहून तत्काळ काढून घ्यावीत, अन्यथा महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
मनीषा खत्री, मनपा आयुक्त





