Saturday, July 11, 2026
HomeनाशिकNashik NMC News : महासभेत ६४ हून अधिक विषयांना मंजुरी; माजी सैनिकाच्या...

Nashik NMC News : महासभेत ६४ हून अधिक विषयांना मंजुरी; माजी सैनिकाच्या अपघाती मृत्यूचा प्रश्न मांडताना दिनकर पाटलांना अश्रू अनावर

परवानगीशिवाय रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढलेले अपघात आणि विस्कळीत पाणीपुरवठा या महासभेत (Mahasabha) मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी सद‌स्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्याची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आडके आहेर (Himgauri Aher-Adke) यांनी महापालिकेची परवानगी न घेता किंवा लोकप्रतिनिधींची नावे पुढे करून रस्ते खोदणाऱ्या महावितरण, बीएसएनएल, एमएनजीएल, मोबाईल कंपन्या तसेच संबंधित ठेकेदारांचर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) आचारसंहिता संपल्यानंतर झालेल्या पहिल्याच महासभेत तहकूब असलेल्या दोन सभांमधील ६४ हून अधिक विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र, सभेचा केंद्रबिंदू ठरला तो शहरातील रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा आणि सिंहस्थाच्या कामांतील हलगर्जीपणा. ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी सातपूर येथील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाच्या प्रकरणावर लक्षवेधी मांडली.

संबंधित कुटुंबीय सभागृहात उपस्थित असताना त्यांची व्यथा मांडताना पाटील यांना हुंदका आवरला नाही. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याविषयी झालेल्या चर्चेत प्रशांत दिवे यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या किमान एका ठेकेदारावर तरी कठोर कारवाई करून संदेश द्यावा, अशी मागणी केली.

आशा तडवी यांनी पाणीकपातीनंतरही अनेक भागांत नियमित पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. संध्या कुलकर्णी यांनी अधिकारी उपलब्ध नसल्याने पाणीटंचाईच्या काळात स्वतःच्या सहाय्यकाला टैंकर व्यवस्थापनासाठी पाठवाचे लागत असल्याची व्यथा मांडली. किरण गामणे यांनी खड्यांचा प्रश्न उपस्थित केला, तर शाह खैरे यांनी विविध यंत्रणांकडून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या खोदकामावर आक्षेप घेतला.

रोहिणी पिंगळे यांनी पंचवटीतील पाणीपुरवठ्याच्या समस्येसाठी स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांना जबाबदार धरले. चर्चेनंतर महापौर सैनिकाच्या हिमगौरी आडके आहेर यांनी प्रशासनाला कठोर निर्देश दिले. सातपूर येथील माजी सैनिक मृत्यूप्रकरणी पोलिसांचा अभिप्राय तातडीने मागवून ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिले. तसेच मृताच्या कुटुंबाला महापालिकेतर्फे आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली.

महापौरांचे आदेश

महापौरांनी शहरातील खड्डे तातडीने बुजविणे, रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करणे, मान्सून टास्क फोर्समार्फत अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करणे, नव्याने नियुक्त ५४ अभियंत्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात कामावर पाठविणे, पाण्याच्या टाक्यांतील गळती तातडीने दुरुस्त करणे आणि आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. वाहतूक व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वॉर्डनच्या ठिकाणांबाबत पोलिसांकडून प्रस्ताव मागविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ जुलै २०२६ : ई-२० चा गदारोळ अन् संभ्रमाचे...

0
देशभरात इथेनॉलमिश्रित ई-२० पेट्रोलच्या वापरावरून सध्या उठलेले वादंग केवळ तांत्रिक स्वरुपाचे नसून थेट सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाशी आणि विश्वासाशी जोडलेले आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलाची...