Thursday, February 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMayor Himgauri Aher-Adke : नाशिकला बनवणार 'न्यू जनरेशन सिटी'- महापौर हिमगौरी आहेर-आडके...

Mayor Himgauri Aher-Adke : नाशिकला बनवणार ‘न्यू जनरेशन सिटी’- महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा विश्वास

आव्हानांवर करणार मात

नाशिक | फारूक पठाण | Nashik

शहराला ‘न्यू जनरेशन सिटी’ अर्थात पुढील पिढीसाठी सक्षम शहर बनवण्यात येईल, असा विश्वास नाशिकच्या महापौरपदी (Nashik Mayor) नुकत्याच विराजमान झालेल्या हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) यांनी व्यक्त केला आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेवर पुन्हा लोकप्रतिनिधींचे नेतृत्व आले असून, त्यामुळे विकासकामांना गती मिळण्याच्या नाशिककरांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहराचा सर्वांगीण विकास साधत नाशिकला सिंहस्थासाठी सज्ज करण्याचा आत्मविश्वास त्यांनी ‘देशदूत’शी बोलताना केला. त्यांच्याशी व्यक्त साधलेला हा संवाद.

- Advertisement -

प्रशासन ‘सक्रिय’ करण्याचे आव्हान

YouTube video player

सुमारे चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने अनेक प्रकल्प रखडले. निर्णयप्रक्रिया संथ झाली. आता लोकप्रतिनिधींची सत्ता आल्याने नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. प्रशासनाला गतिमान करणे, प्रलंबित कामांना गती देणे आणि शहराला विकासाच्या मार्गावर नेणे हे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.

मुलाखत

प्रश्न : महापौरपद स्वीकारल्यानंतर तुमचे प्राधान्य कशाला आहे?

उत्तर : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील हरवलेला संवाद पुन्हा सुरू करणे हे माझे पहिले उद्दिष्ट आहे. प्रभागनिहाय दौरे करून लोकांच्या अडचणी समजून घेणार असून, त्या केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी नगरसेवक, अधिकारी आणि प्रशासन यांना एका टीमप्रमाणे काम करायला लावणार आहे.

प्रश्न : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहर सज्ज करण्यासाठी काय आराखडा आहे?

उत्तर : सिंहस्थ ही नाशिकसाठी सुवर्णसंधी आहे. साधुग्राम, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिः सारण, गोदावरी स्वच्छता अशा सर्व कामांना गती देण्यात येईल. दर्जेदार आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा तयार करणे हे ध्येय आहे.

प्रश्न : शहरातील पार्किंग समस्या कशी सोडवणार?

उत्तर : शहरातील बाजारपेठ व जुन्या भागात पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. यशवंत मंडई परिसरात बहुमजली पार्किंग इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच इतर ठिकाणीही ‘पे अँड पार्क’ पद्धतीने जागा विकसित केल्या जातील. त्यासह स्मार्ट पार्किंगसारखे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. सध्या काही ठिकाण त्याचे नियोजन झाले आहे.

प्रश्न : गोदावरी प्रदूषणाबाबत ठोस उपाय?

उत्तर : सांडपाणी थेट नदीत जाणार नाही, यासाठी मलनिःसारण प्रकल्प पूर्ण केले जातील. अमृत-२ योजनेतून मलजलवाहिन्या टाकल्या जातील. ‘नमामि गोदा’ हा सिंहस्थाचा केंद्रबिंदू राहणार आहे. त्याचप्रमाणे, केंद्रासह राज्य शासनाकडून मदत घेऊन आणखी काही करता येईल का, याबाबत नियोजन करण्यात येईल.

प्रश्न : पाणीपुरवठ्यातील असमानता कशी दूर करणार ?

उत्तर : नवीन जलवाहिन्या, विल्होळी केंद्राची क्षमतावाढ आणि जीर्ण लाईन बदलण्यावर भर असेल. पाणी समप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. शहरातील सर्व भागांना वर्षभर नियमित व मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाला सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

प्रश्न : रस्त्यांवरील खोदकाम व खड्डे कायमचे दुरुस्त होईल का?

उत्तर : व्हाइट टॉपिंग रस्त्यांसोबत डक्ट सिस्टीम तयार केली जात आहे; जेणेकरून पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत. काही काळ त्रास होईल; पण दीर्घकालीन सुविधा मिळतील. नाशिक शहर खड्डेमुक्त करण्यावर आमचा भर राहणार आहे.

प्रश्न : स्वच्छतेसाठी काय बदल दिसतील?

उत्तर : कचरा वर्गीकरण, ई-कचरा प्रकल्प, यांत्रिकी झाडू आणि नागरिकांचा सहभाग वाढवणार आहोत. नाशिकनगरी स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच पर्यावरणपूरकदेखील करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विविध योजनांचा विचार असून लवकरच त्यासाठी विशेष बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. नाशिक शहर हे स्वच्छ शहरांमध्ये अग्रस्थानी नेण्यासाठी परिश्रम घेण्यात येतील.

प्रश्न : अतिक्रमणांवर ठोस कारवाई होईल का?

उत्तर : वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली जातील. ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहील. त्याचप्रमाणे, आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन प्रशासनाने केले असून महापालिकेच्या ज्या जागांवर इतरांनी अनधिकृतपणे कब्जा केला आहे, त्या सर्व जागा मोकळ्या करून सिंहस्थात कोणतीही अडचण येणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

प्रश्न : प्रशासन सक्षम कसे करणार?

उत्तर : महापालिकेत मागील सुमारे २५ वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. आस्थापना खर्च मर्यादा नियंत्रित नसल्याने ती रखडल्याचे जाणवते. शासनाकडे नव्याने मागणी करून नोकर भरतीसह तांत्रिक पदांसाठी परीक्षा आणि अधिकाऱ्यांना जबाबदार बनवणे यावर भर असेल.

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतींना

Grampanchayat Elections: राज्यातील ग्रामपंचायतींना दिलासा! नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

0
नागपूर | Nagpurराज्यातील ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपणार आहे, त्या ठिकाणी निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...