नाशिक | Nashik
आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) घटक पक्षांतील अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांत प्रवेश करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मविआतील घटक पक्ष कमकुवत होतांना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) मनसे आणि काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला होता.
काँग्रेसच्या (Congress) प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक दातीर, माजी नगरसेविका रंजना बोराडे, पवन पवार, मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा महायुतीमधील मुख्य घटक पक्ष असणारा भाजप (BJP) मनसेला (MNS) मोठा धक्का देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे २५ ते ३० पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पडणार आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे हे पदाधिकारी पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत होते. मात्र, आता ते मनसैनिक पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याने ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, मागील महिन्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नाशिकमध्ये (Nashik) येऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, तरीही मनसे पदाधिकारी आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (NMC Election) पूर्वीच मनसेला गळती लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.