इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Local Body Election) मनसेचे (MNS) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत आजपासून (दि.१४) पुढील तीन दिवस इगतपुरीमधील कॅमल व्हॅली रिसोर्टमध्ये शिबिर पार पडणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून पक्षप्रमुख राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नसल्या तरी मनसेने निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
इगतपुरीमध्ये (Igatpuri) होणाऱ्या या शिबिराचे मुख्य आकर्षण पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे मार्गदर्शन असणार आहे. काही दिवसांपासून मराठीच्या (Marathi) मुद्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसेला साथ लाभली आहे. आठवडाभरापूर्वी राज व उद्धव ठाकरे यांनी तब्बल वीस वर्षांनी राजकीय व्यासपीठावर एकत्रित येत मराठीचा सूर आवळला. या मेळाव्यात दोन्ही बंधूंनी भविष्यात एकत्र वाटचाल करण्याचे संकेत दिले. पण मेळावा पार पडताच राज ठाकरे यांनी शिवसेनेशी युती करण्यावरून कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, असे आदेश मनसैनिकांना दिले होते.त्यामुळे मनसैनिक व शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसेच्या शिबिरामध्ये (MNS Shibir) आगामी निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. तसेच राज ठाकरेही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे इगतपुरीत राज ठाकरे कोणती नवी भूमिका घेणार? तसेच निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना कोणता कार्यक्रम देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून, हळुहळु मनसेचे महाराष्ट्र भरातून पदाधिकारी जमण्यास सुरुवात होत आहे.
राज ठाकरेंसाठी नाशिक पुन्हा ‘लकी’ ठरणार?
नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. त्यानतंर २००७ च्या निवडणुकीत मनसेचे नाशिक महापालिकेत १२ नगरसेवक निवडून आले. तर २००९ मध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघांत मनसेचे आमदार (MLA) निवडून आले. यामध्ये नाशिक मध्यतून वसंत गिते, पश्चिममधून नितीन भोसले आणि पूर्वतून दिवंगत नेते उत्तमराव ढिकले यांनी विजय मिळविला होता. यानंतर २०१२ मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे तब्बल ४० नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या मदतीने महापालिकेत सत्ता मिळवत यतीन वाघ आणि अशोक मुर्तडक यांना महापौर केले.
तर २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवचा सामना करावा लागला होता. यात २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेकडून हेमंत गोडसे यांना रिंगणात उतरवले होते. मात्र,या निवडणुकीत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विजयी झाले. पंरतु, गोडसे यांनी त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील मनसेच्या उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव झाला. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या ४० नगरसेवकांची संख्या अवघी ५ वर आली. हा मनसेसाठी मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर आता पुन्हा आगामी निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली असून, त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत शिबिर पार पडत आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा मनसेसाठी ‘लकी’ ठरणार का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.





