नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीतील (Mahapalika Election) भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची आज (रविवारी) गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा, नाशिक दत्तक घेतल्यावरून विरोधकांनी केलेली टीका आणि ठाकरे बंधूंच्या नाशिकच्या सभेवरून जोरदार हल्लबोल केला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “नाशिकमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रभू श्री रामांना नमन करतो. काल परवा दोन भाऊ नाशिकमध्ये आले त्यांना प्रभू श्री रामांची आठवणच झाली नाही. अलीकडच्या काळात काही लोक देव आहे की नाही असे म्हणत देवाची खिल्ली उडवायला लागले आहेत. नाशिक शहरात जो काही विकास झाला आणि जो होणार आहे त्याची क्षमता फक्त भाजपमध्येच आहे. मी नाशिक दत्तक घेतलं २०१७ साली आणि विरोधी पक्षनेता २०१९ साली झालो. करोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाचे लोक घरी बसले होते, तेव्हा नाशिकमधील कोविड सेंटरला भेट देणारा देवा भाऊ होता. नाशिकची जबाबदारी मी घेतली आहे आणि ती पार देखील पाडत आहे. २०१७ च्या आधी नाशिककरांनी मनसेलाही सत्ता दिली होती, परंतु त्यांना काहीच करता आले नाही”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पुढील काळात प्रत्येकाच्या घरात पाणी देण्याचे काम आपण करणार असून, त्यासाठी नाशिककरांच्या पुढच्या २५ वर्षांच्या पाण्याचे नियोजन केले आहे. २०१५ साली कुंभमेळ्यासाठी आमच्याकडे वेळ कमी होता, त्यावेळी महापालिकेने आम्हाला एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे तेव्हा आम्ही सर्व प्रकारचा निधी दिला होता. नाशिकमध्ये जवळपास तीस हजार कोटींची कामे आम्ही हातात घेतली असून, या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची धमक फक्त भाजपमध्ये आहे. याशिवाय नाशिकमध्ये चार हजार सीसीटीव्ही कॅमरे बसवणार असून, त्यावर एआयचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे नाशिकमधील गुन्हेगारीला आळां बसेल. तसेच १० हजार कोटींचा रिंगरोड तयार करत असून,चार राष्ट्रीय आणि चार राज्य महामार्ग तयार करत आहोत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे शहर जोडण्याचे काम रिंगरोडच्या मध्यातून होणार आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच “नाशिक-पुणे रेल्वे मार्ग आपण तयार करत असून, त्यामुळे २०० किलोमीटरचा प्रवास नाशिककरांसाठी सुखकर होणार आहे. १३०० कोटींच्या पुलाचे काम हाती घेतले आहे. रामकल पथचे काम आपण हाती घेतलं आहे. यामुळे खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामाचे दर्शन भाविकांना होणार आहे. साधुग्रामची जागा २४०० कोटी रुपये देऊन विकत घेणार आहोत. आम्हाला तपोवनातील कुठलीच मोठी झाडे तोडायची नाहीत. फक्त छोटी झुडुपे तोडायची आहेत. हे प्रकरण आता कोर्टात गेल्याने त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. साधुग्रामच्या ठिकाणचे झाडे तोडण्याच्या अफवा काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी पसरवल्या आहेत”, असा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
गिरीश महाजन काय म्हणाले?
सर्व प्रथम मी पंकजाताईंचे आभार मानतो. कारण त्यांच्या सासऱ्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हत्या. परंतु, मी विनंती केल्याने त्या या सभेला उपस्थित राहिल्या. नाशिककरांनी गेल्यावेळी महापालिकेत ६७ नगरसेवक निवडून दिले होते, त्यामुळे यावेळेस १०० हून अधिक नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहेत. यावेळेस राज्य आणि केंद्र सरकारकडून कुंभमेळ्यासाठी ३० हजार कोटींचा निधी आला आहे. मागील वेळेस फक्त सहा हजार कोटींचा होता. नाशिकमधील बावीसशे कोटी रुपयांचे रस्ते सिमेंटचे करत आहोत. त्यामुळे येथून पुढे रस्त्यावर खडे पडणार नाहीत. यावेळेसचा कुंभमेळा ऐतिहासिक आहे. गेल्या वेळेपेक्षा यंदाचा कुंभमेळा अधिक पटीने चांगला होणार आहे. तपोवनात साधूंच्या निवासाची व्यवस्था केली आहे. परंतु, पर्यावरणप्रेमींनी तेथील झाडे तोडण्याला विरोध केला. धार्मिक कार्यक्रमांत काहीतरी खीळ घालण्याचा प्रयत्न डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केला.
ठाकरे बंधूंनी दोन दिवसांपूर्वी मला लाकूडतोड्या म्हटले. त्यांना फक्त विरोध करायचा आहे. देवेंद्र फडणवीस विकासाशिवाय त्यांच्या सभांमध्ये काहीच बोलत नाहीत. निवडणुका आल्या की मुंबई खतरे मे असे ठाकरे बंधू म्हणतात. करोनाच्या काळात तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाले. पाचवर्ष घरात बसायचे, निवडणुका आल्या की गर्दी जमा करायची आणि लोकांच्या नकला करायच्या, मात्र तुमच्या भाषणामुळे लोकांची फक्त करमणूक होते. लोक ठाकरे बंधूंना स्वीकारायला तयार नसून, लोकांचा विश्वास फक्त भाजप आणि महायुतीवर आहे. नाशिक महापालिकेत आपल्याला भाजपचा महापौर बसवायचा आहे. नाशिकचा विकास होण्यासाठी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून आपला महापौर बनवून विकासाला हातभार लावा, असे त्यांनी म्हटले.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
नाशिक ही महाराष्ट्राची देव भूमी असून, या देव भूमीत स्वत: देवाभाऊ आले आहेत. त्यामुळे नाशिककर दुसरे कुठलेही बटन दाबणार नाहीत याचा मला विश्वास आहे. नाशिकने विधानसभेत तीन आमदार पाठवले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेत देखील आपलाच महापौर बसवायचा आहे. कुंभमेळ्याच्या पाश्वर्भूमीवर भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. हे सर्व करण्याची धमक फक्त भाजपमध्येच आहे. मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ नाशिककडे मोठ्या अपेक्षेने बघितले जाते. त्यामुळे १५ तारखेला सकाळी महिलांनी घरातील सर्व कामे आटोपून मतदानासाठी बाहेर पडून कमळाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.




