नाशिक l शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
भोंदूबाबा अशोक खरातचे एवढे वाभाडे निघत असतांनाही कोणा बडेबाबा नावाच्या भोंदूगिरी करणार्याचा उच्छाद सध्या निफाड तालुक्यात सुरु आहे. ‘देशदूत’ने याविषयीचा भांडाफोड नुकताच केला असला तरी या बाबाने निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शेकडो अंधभक्तांची होत असलेली गर्दी पाहून सगळेच व्यर्थ वाटायला लागते. खरातने जो काही विकृतपणा केला त्याने समाज हादरला असे वाटत होते, परंतु समाजच एवढा मुर्दाड अन्? आंधळा झालेला आहे व त्याला अशी काही ग्लानी आली आहे की त्यांच्यापुढे विकृतांचे कितीही निरुपण केले तरी ते बाबा-बुवांच्याच नादी लागणार हे वारंवार घडते.
हा बाबा देखील स्रीलंपट. त्याच्याविरोधात तसा गुन्हाही दाखल आहे. पतीचे दारुचे व्यसन सोडवून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून या भामट्याने एका ४२ वर्षीय महिलेवर अत्याचार केले. स्मशानातील पूजा आणि जीवितास धोका याची भीती घालून तसेच पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून सदर महिलेवर काही वर्षे अत्याचार करुन फसवणूकही केली. नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलही आहे. याशिवाय आणखी तीन-चार महिलांनीही या बडेबाबाच्या कारनाम्यांची तक्रार केलेली आहे. असे सगळे असतांनाही हा बडेबाबा उर्फ गणेश जगताप मोठ्या दिमाखात धारणगाव खडक येथे येतो काय आणि कोट्यवधी रुपये खर्चून कामाख्या देवीचे मंदिर उभारतो काय, सगळेच अघोरी, अद्भूत आणि अनिष्ठ.
खरातने देखील इशान्येश्वर मंदिराच्या माध्यमातूनच नको ते उद्योग केले. हा बडेबाबाही त्याचीच री ओढत असल्याचे त्याच्या कारनाम्यांवरुन दिसते. या भामट्याविषयी माध्यमांनी बातम्या देऊनही ना पोलिसांनी त्याला कधी हटकण्याचा प्रयत्न केला ना प्रशासनाने. स्थानिक ग्रामपंचायतीने देखील याबाबत काहीच शहानिशा केलेली दिसत नाही. मीरगावबाबत खरातने जे काही केले त्याचीच कॉपीकॅट या बडेबाबाने धारणगावला केलेली दिसते. मंदिरासाठी जागा कशी मिळाली, मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा कसे केले, या बाबाला कोणाचे सहकार्य आहे याची चौकशी व्हायला हवी. या कामाख्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आदींच्या छबी आहेत. आज हे लिहित असेपर्यंत यापैकी कोणीही त्याला याबाबत ना हटकले ना जाब विचारला. हे असे होते म्हणूनच सामान्यांची फसगत होते.
एकतर शासनातील मंडळींना समाजात काय चांगले वा काय वाईट याची माहिती असायलाच हवी किंवा त्यांना त्यांच्या गुप्तचरांकडून किमान त्याची माहिती तरी कळायला हवी. बडेबाबाच्या उद्योगांची अद्याप तरी यापैकी कोणालाच काही माहिती मिळालेली दिसत नाही. या बोगस बाबाच्या कहान्या मौखिक व लिखित स्वरुपात कर्णोपकर्णी होत असतांनाही कोणीही या बाबाशी असलेल्या कथित संबंधाचा इन्कार केलेला नाही. नेत्यांचे तर सोडाच, पण त्यांचे गल्लीबोळातील बगलबच्चे देखील अज्ञानी असतील तर या समाजाचे काही खरे नाही. खरातप्रकरणामुळे अंधभक्तांचे डोळे उघडले असतील असे वाटत होते, प्रत्यक्षात आपला समाजच एवढा दांभिक आणि बुवाबाजीच्या नादाला आहे की त्यांच्या कानीकपाळी ओरडूनही काहीच उपयोग होत नाही. फसवले, नागवले गेल्यानंतर हीच मंडळी घशाला कोरड पडेपर्यंत अन्यायाची तक्रार करतात, पण डोक्याचा वापर वेळीच करीत नाहीत. अगदी उच्चशिक्षित लोकही जेव्हा अशा बाबांच्या चरणी लीन-दीन होतात, तेव्हा यांच्या शिक्षणाचीही कीव येते.
तुका म्हणे नटधारी |
भोग भोगून ब्रम्हचारी ॥
अर्थ इतकाचि साधिला
हे सारे आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे. गावातील मंदिरांमध्ये सातत्याने हरिनाम सप्ताह साजरे होत असतात. कीर्तनकार संतांचे दाखले देत विद्यमान व्यवस्थेवर कोरडेही ओढतात. उपस्थित हसून दादही देतात. पण जे ऐकतात, ते तेथेच सोडून घरी परततात की काय? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, अशी गत झाली आहे. दिसला बाबा की पड पाया, जा त्याच्या मागे मेंढराप्रमाणे हे असे किती दिवस चालणार. एकीकडे भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायच्या गोष्टी करतो, किती कमी खर्चात मंगळावर पोहोचलो यावरुन पाठ थोपटून घेतो आणि दुसरीकडे अशा पापपुण्याच्या भाकडकथा सांगून लोकांना लुटले जाते, महिलांवर अत्याचार केले जातात, यातील नेमके खरे काय समजायचे! आपण सुधारलो आहोत की सुधारल्याचा आव आणतोय? सरकारमध्ये असलेल्यांनीही याबाबत एकदा भूमिका स्पष्ट करायला हवी. तुम्हा तहहयात सत्तेत राहा, पण लोकांना धर्माच्या आडून या अशा बाबा-बुवा-फकीरांच्या नादाला लावण्याचे महापाप तरी करु नका. या असल्या बाबांच्या विकृतपणामुळे नाशिकसारखे पौराणिक शहर अलिकडे बदनाम होऊ लागले आहे. हे सारे थांबवायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी घुमेपणा सोडून या असल्या भानगडींचा उघडपणे निषेध करायला हवा. लोकप्रतिनिधी गपगुमान असल्याने त्यांचे कार्यकर्तेही थंड आहेत. लोक मात्र भरडले जातच आहेत. हे थांबवणार कोण?





