नाशिक | Nashik
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारांच्या (Nagarparishad and Nagarpanchayat Candidate) अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या (सोमवारी) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनमाडला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची त्र्यंबकेश्वर येथील रेणुका हॉलच्या शेजारी असलेल्या पटांगणांत सकाळी १० वाजता भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार असल्याची माहिती नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे सकाळी ११.३० वाजता सभा होणार आहे.
भाजपने (BJP) त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी कैलास घुले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेश गंगापुत्र यांचे आव्हान आहे. आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने त्र्यंबक शहराच्या विकासावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार, स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, त्र्यंबकला नगराध्यक्षपदासाठी (Town President) आठ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या २० जागांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १९ जागांसाठी ५३ उमेदवार मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक १ ब मधून भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या मंजूषा रवींद्र वारूणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवकपदासाठी १९, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १२, शिंदेंच्या शिवसेनेचे १२ आणि काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत. याशिवाय काही अपक्ष देखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे याठिकाणी नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी तीव्र स्पर्धा बघायला मिळणार आहे.





