नाशिक | Nashik
जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषदेवर (Igatpuri Nagarparishad) गेली तीस वर्ष एकहाती सत्ता राखणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर (Sanjay Indulkar) आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत नाराजीचा लाभ उठवत शिवसेनेने इगतपुरी नगरपरिषदेवर आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपला धक्का देणारा ठरला होता. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले होते. तसेच ही निवडणूक (Election) त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने लढवली होती. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंदुलकरांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने इगतपुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह (Town Council President) १८ पैकी १३ जागा जिंकून शिवसेनेने एकहाती वर्चस्व कायम राखले होते. तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. याशिवाय शिवसेनेने तिकीट नाकारलेला एक जण अपक्ष म्हणून विजयी झाला होता. तर बहुजन विकास आघाडी,काँग्रेस, भारिपचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला होता. तसेच बहुचर्चित नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय इंदुलकर यांनी भाजपच्या फिरोज पठाण यांचा दारुण पराभव केला होता.




