नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) उद्या (दि.१५) रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. मात्र त्याआधी नाशिकच्या सिडकोमधील प्रभाग २९ मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने मोठी राजकीय खेळी केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : मतदानाआधी ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात; मतांचा फुटला मोठा भाव
भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांना मनसे आणि उबाठाने पाठिंबा दिला आहे. शहाणे हे प्रभाग क्रमांक २९ (अ) मधून निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर भाजपच्या दीपक बडगुजर यांचे आव्हान आहे. दीपक बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत. भाजपने आधी दिपक बडगुजर यांना उमेदवारी देऊन नंतर मुकेश शहाणे यांना दिली. पंरतु, एबी फॉर्म उशीरा मिळाल्याने मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म असलेला अर्ज बाद झाला होता. त्यामुळे मुकेश शहाणे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागत आहे. उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शहाणे यांना भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तरीही ते निवडणूकीला सामोरे जात आहे.
हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची
तसेच प्रभाग क्रमांक २९ मधील ‘अ’ गटातून भाजपचे दीपक बडगुजर (Deepak Badgujar) आणि अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्यात खरी लढत होणार असली तरी त्यांच्यासमोर शिंदे सेनेचे जनार्दन नागरेंचे कडवे आव्हान असणार आहे. तर ‘ब’ गटातून भाजपकडून माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी डॉ.योगिता हिरे रिंगणात असून, त्यांच्यासमोर शिंदे सेनेच्या श्रद्धा पाटील आणि मनसेच्या वर्षा वेताळ मैदानात आहे. याशिवाय ‘क’ गटातून भाजपच्या छाया देवांग यांच्याविरुद्ध शिंदे सेनेच्या सुमन सोनवणे व ठाकरे शिवसेनेच्या मोनिका वराडे रिंगणात आहेत. तसेच ‘ड’ गटातून भाजपचे भूषण राणे यांच्यासमोर शिंदे सेनेचे जितेंद्र जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे देवा वाघमारे यांच्यात लढत होत आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
दरम्यान, प्रभाग क्रमांक २९ मधून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग असे चार नगरसेवक निवडून आले होते. पूर्वीपासूनच हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आता प्रभागातील ‘अ’ गटात दीपक बडगुजर व मुकेश शहाणे यांच्यात काट्याची लढत होत असून, शहाणे यांना मनसे आणि उबाठाचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे या प्रभागातील चुरस आणखी वाढली असून, कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
किती मतदार बजावणार हक्क?
नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.




