नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये शिवतीर्थ, मुंबईलगतच्या अन्य मनपांसाठी आणि नाशिकमध्ये संयुक्त सभा होणार आहे. त्यात उद्या म्हणजेच (शुक्रवारी) सायंकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. पक्षातील फाटाफुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच संयुक्तपणे प्रचारात उतरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
यापूर्वी शिवसेनाप्रमुख हिंदूहृद्यसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली अधिवेशन घेतले होते. तसेच त्यानंतरच्या दशकामध्ये नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभांना राज आणि उद्धव हे दोन्ही बंधू उपस्थित असले तरी त्यांचा प्रमुख वक्त्यांमध्ये समावेश नव्हता. त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख वक्ते बाळासाहेब ठाकरे, तर भाजपचे प्रमुख वक्ते हे प्रमोद महाजन असायचे. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये (Nashik) एकाच व्यासपीठावर भाषणे केली असली तरी दोन स्वतंत्र पक्षाचे दोन सर्वोच्च नेते म्हणून ते उद्या प्रथमच नाशिकच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. यामुळे उद्याच्या सभेतून ठाकरे बंधू कुणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, नाशिक येथे दोन्ही बंधूंची (Brothers) तोफ धडाडल्यानंतर उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरला १० जानेवारी रोजी सभा होणार आहे. तर ११ जानेवारीला राज आणि उद्धव यांची शिवतीर्थवर संयुक्त सभा पार पडणार आहे. तसेच ठाणे आणि मुबंईतील उपनगरांत देखील ठाकरे बंधूची संयुक्त सभा होणार आहे. त्यामुळे या संभातून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
आदित्य-अमित ठाकरे यांचाही रोड शो होणार
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही सक्रिय होणार असून, मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही दोघांचा संयुक्त रोड शो आयोजित करण्यात येणार आहे. दोन्ही युवा नेते एकत्र प्रचारात उतरणार असल्याने नाशिकच्या राजकीय वातावरणात चांगलेच तापणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे अनेक विद्यमान व माजी नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत गेले असल्याने पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्रिकरणानंतर नाशिकमध्ये ही जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ऐतिहासिक सभेमुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठी चालना मिळणार असून, शहराच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




