नाशिक | Nashik
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) नाशिक महापालिकेवर शहरातील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढला जाणार आहे. त्याआधी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता भाजप आणि केंद्र सरकारवर (BJP and Cnetral Government) जोरदार टीका केली.
इडियट हा शब्द असंसदीय नाही
यावेळी ‘इडियट’ या शब्दाच्या वापराचे समर्थन करताना राऊत म्हणाले, “इडियट हा शब्द अजिबात असंसदीय नाही. या देशात ‘थ्री इडियट्स’ नावाचा चित्रपट आला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि खुद्द पंतप्रधानांनी तो सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला होता. मग इडियट म्हणण्यात चुकीचे काय? या देशाच्या राजकारणात तीन इडियट्स आहेत; त्यातील एक महाराष्ट्रात आहे तर दोन केंद्रात बसले आहेत, हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकार आणि गृहमंत्र्यांवर निशाणा
केंद्रातील धोरणांवर आणि भाजपच्या वक्तव्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, “ज्यांना वंदे मातरमचा इतिहासच माहीत नाही, त्यांनी काँग्रेसला माफी मागायला सांगू नये. १८९६ च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा ‘वंदे मातरम’ गायले गेले, तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुस्लिम धुरीण होते. स्वातंत्र्य मिळाले त्या मध्यरात्री संसदेत जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर आचार्य कृपलानी यांनी वंदे मातरम गायले होते. भाजपचे नेते व्यापारी वृत्तीचे आहेत, त्यांनी इतिहास शिकण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये जाऊन काम करावे. तसेच परीक्षांचे पेपर फुटणे, लाल किल्ल्यावरून भाषण करताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडणे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरून संसदेतून पळ काढणे या घटनांवरून देखील
राऊत यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
शरद पवार कुठेही जाणार नाहीत
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते ‘इंडिया’ आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे खंदे नेते आहेत. ‘आम्ही विरोधातच आहोत आणि जोमाने लढू’ हे पवारसाहेबांनी आधीच स्पष्ट केले आहे. भाजप केवळ भ्रम पसरवण्याचे काम करत आहे, पण आम्ही एकत्र लढून विजय मिळवू, असेही संजय राऊत म्हणाले.




