नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या १२२ जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरूच आहे. महायुतीचे घोडे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी मांडलेल्या प्रस्तावामुळे अडकले असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, भाजप ८५ जागा लढवण्यावर ठाम असून, शिवसेना शिंदे पक्षाला ४५, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ३० जागा लढवायच्या असल्याने जागावाटपाचे त्रांगडे सुटण्याची चिन्हे रविवारीही दिसली नाहीत.
भाजपकडून (BJP) सातत्याने कथित ‘इलेक्ट्रिव्ह मेरिट’ फॉर्म्युला पुढे केला जात आहे. शहरात पक्षाच्या ताकदीनुसार किमान ८५ जागांच्या खाली भाजप उतरायला तयार नाही. उलट, दिवसागणिक जागावाटपावरील पकड भाजप अधिकाधिक मजबूत करत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अकराशेवर गेली असून, तीदेखील त्यांच्यापुढची एक मोठी समस्या आहे. इलेक्ट्रिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी भाजपची भूमिका आहे. गेल्या महापालिकेतील ९० च्या आसपास नगरसेवक पक्षात डेरेदाखल झाल्याचे वास्तव त्यामागे आहे. भाजप शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र, जागावाटप न सुटल्यास सर्व जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) शहरात ठाण मांडून होते. तसेच, शिवसेना शिंदे पक्षाचे नेते दादा भुसे यांच्या संपर्कातही होते, असे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष चर्चा उभय नेत्यांमध्ये होऊ शकली नाही. सोमवारी सायंकाळी अथवा मंगळवारी सकाळी एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपखालोखाल शिंदे सेनेकडे इच्छुकांची गर्दी आहे. रिपब्लिकन सेनेची आधीच शिंदे सेनेसोबत युती झाली असून, त्यामुळे मित्र पक्षांमध्येच काट्याची लढत शक्य आहे.
जागा १२२, एकूण दावा १६० चा
तीनही पक्षांच्या मागण्यांची बेरीज १६० वर जाते, तर उपलब्ध जागा १२२ आहेत. त्यामुळे हे गणित कसे सोडवायचे असा प्रश्न तिन्ही घटकपक्षांपुढे उभा राहिला आहे.
आज अंतिम निर्णय होणार का?
दरम्यान, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन व शिक्षणमंत्री दादा भुसे हे रविवारी एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यात प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नाही. सोमवारी (दि. २९) महायुतीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.




