संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने संगमनेरमध्ये वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही आमदारांनी याबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मुंबई, नाशिक व पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक-पुणे रेल्वेकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी रेल्वेचा मार्ग बदलला असून कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर-जुन्नर-नारायणगाव मार्गे रेल्वे होण्याकरीता मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले. तर हा रेल्वेमार्ग संगमनेरातूनच व्हावा, ही माझी सुरुवातीपासूनची ठाम भूमिका असून, यासाठी मी केलेला पाठपुरावा कधीच थांबलेला नाही.
संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा, भविष्यातील वाहतूक सुविधांचा आणि उद्याच्या पिढ्यांच्या संधींचा हा अत्यंत निर्णायक विषय आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे हलक्यात पाहणे म्हणजे संगमनेरच्या भवितव्याशी तडजोड करण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले. त्यामुळे या मुद्द्यावरुन आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. नाशिक-पुणे रेल्वे ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुणे जाणार अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. यानंतर संगमनेरसह सिन्नर, नारायणगाव, चाकण या भागामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यानंतर संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने बैठकीत जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. या बैठकीस आमदार सत्यजीत तांबे, डॉ. मैथिली तांबे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार तांबे म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे मंजूर झाल्यानंतर संगमनेर भागातील भूसंपादन करण्यात आले, याचबरोबर शेतकर्यांना त्याचे पैसेही देण्यात आले. मात्र राजकीय डाव साधत जीएमआरटीचे कारण सांगून रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. जगामध्ये पंधरा ठिकाणी जीएमआरटीच्या प्रकल्पाजवळून रेल्वे गेलेली आहे त्यामध्ये कुठलीही अडचण झालेली नाही. याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेला नाही. हा पुण्यावरून पुणतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेर-मंचर-चाकण मार्गे झालीच पाहिजे यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेन व ऑनलाईन पिटिशन दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी राजकारण विरहित सहभागी होवून संगमनेरमधून रेल्वेसाठी आपला सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तर याप्रश्नी भूमिका स्पष्ट करताना आमदार खताळ म्हणाले, अलिकडे या प्रकल्पासंदर्भात जीएमआरटीच्या तांत्रिक कारणांचा मुद्दा पुढे आला असला, तरी त्या कारणांचा संगमनेरवर होणारा प्रत्यक्ष परिणाम सरकारला देखील जाणवत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकार्यांशी थेट संवाद साधून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासली जावी, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. या निर्णयाचा संगमनेरच्या विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने हा प्रश्न मी अत्यंत जबाबदारीने पुढे नेत आहे.
संगमनेरच्या जनतेच्या अपेक्षा योग्य दिशेने पूर्ण होत नसतील, तर त्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. रेल्वेमार्गाबाबतचा मुद्दा हा कोणाच्या विरोधाचा किंवा कोणाच्या बाजूने उभे राहण्याचा विषय नाही. हा विषय संपूर्ण संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला संघर्ष आहे आणि या संघर्षात मी निगर्वीपणे, सातत्याने आणि ठामपणे माझ्या संगमनेरच्या जनतेसोबत उभा आहे, असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.





