Thursday, June 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain News : नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

Nashik Rain News : नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

मान्सूनचे (Monsoon) राज्यात आगमन झाल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळच्या सुमारास पावसाने (Rain) शहरातील विविध भागांत हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) मोठा दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा पसरला आहे. शहरातील सीबीएस, शालिमार, सिडको, त्र्यंबकरोड यासह विविध भागांत पाऊस कोसळला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) रस्त्यावरील पादचाऱ्यांची आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisement -

पंचवटीत पावसाची दमदार हजेरी

तब्बल अठरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (ता. २३) दुपारी पावसाने पंचवटीत दमदार आगमन करत निसर्गाच्या रंगमंचावर आपली उपस्थिती ठसवली. दुपारच्या साडेबारा वाजताच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि पावसाच्या सरांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याचा सुखद स्पर्श दिला. मखमलाबाद, आडगाव, वरवंडी, म्हसरूळ आणि नांदूर-मानूर परिसरात पावसाने अक्षरशः जलधारा बरसवल्या. काही ठिकाणी गारांच्या सरींनीही हजेरी लावत वातावरणात वेगळीच रंगत आणली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर धावपळ उडाली, तर नागरिकांनी आसऱ्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेतला. पावसाच्या सततच्या सरींनी शहरातील अनेक रस्ते, चौक आणि सिग्नल परिसर जलमय झाले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्याने जणू लहान तळ्यांचे रूप धारण केले होते. दुचाकीस्वार, पादचारी आणि वाहनचालकांना या जलसाठ्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली.

बाजारपेठांतील गजबज काही काळासाठी ओसरली

भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या मालावर पावसाचा मारा झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. पावसाने दिलेला गारवा सुखावणारा असला तरी काहींसाठी तो चिंतेची सर घेऊन आला. जुना आडगाव नाका, मखमलाबाद रोड, क्रांतीनगर, ड्रीम कॅसल चौक, पंचवटी कारंजा, नाग चौक, गजानन चौक, सरदार चौक, रामवाडी, अमृतधाम चौक, म्हसरूळ आणि अन्य भागांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. गंगाघाट परिसरातही दरवर्षीप्रमाणे यंदा तीच कथा पुन्हा अनुभवायला मिळाली. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली असून, पावसाचा आनंद आणि पाण्याचा त्रास यांच्यातील हा विरोधाभास पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

ग्रामीण भागातही जोरदार पाऊस

दरम्यान केवळ शहरातच (City) नव्हे, तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि पेठ या भागातही काल (सोमवारी) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी देखील पाऊस झाला. या पावसामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना आता वेग येणार असून, खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे बळीराजाच्या (Farmer) चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

0
पुणे |प्रतिनिधी| Pune नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, बुधवारी (24 जून) मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची अधिकृत घोषणा हवामान शास्त्र विभागाने...