त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
नक्षत्र बदलानंतर हस्त नक्षत्राच्या पावसाने त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City) परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. आज (दि. २९ सप्टेंबर) रोजी ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) ब्रह्मगिरी पर्वतावरील कोरड्या पडलेल्या धबधब्यांना पुन्हा एकदा नवे जीवदान मिळाले आहे. सप्टेंबरच्या शेवटी ब्रह्मगिरीचे धबधबे अशा प्रकारे ओसंडून वाहताना पाहणे हे पर्यटकांसह स्थानिकांसाठी अत्यंत नयनरम्य दृश्य ठरले आहे.
दोन तास संततधार; धबधबे प्रवाहित
आज (मंगळवारी) अचानक आलेल्या ढगांच्या गडगडाटासह पावसाने परिसर झाकोळून टाकला होता. सलग दोन तास पावसाची (Rain) जोरदार हजेरी राहिली, ज्यामध्ये एक तास मुसळधार तर त्यानंतर एक तास हलका पाऊस झाला. या पावसामुळे ब्रह्मगिरी पर्वतावरून पांढरेशुभ्र धबधबे पुन्हा प्रवाहित झाले होते.
सप्टेंबर अखेरीस दुर्मिळ निसर्गरूप
सामान्यतः ऑगस्ट महिन्यात त्र्यंबकेश्वरचे धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असतात. मात्र यंदा पावसाने सप्टेंबरच्या शेवटी जोर धरल्याने पर्यटकांना सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा अनुभव आणि धबधब्यांचे अद्भूत रूप पाहायला मिळाले. या अचानक आलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलले असून निसर्गप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे.




