त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City) ग्रामीण भागात बुधवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, काही ठिकाणी घरांच्या भिंती आणि पत्रे उडाले आहेत. अशातच त्र्यंबक शहरातील मेनरोड भागात वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे घराचे पत्रे उडून तिघेजण जखमी झाले आहेत. यामध्ये एक गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री ८:०२ वाजेच्या सुमारास ८ भाविकांचा (Devotees) समूह मेनरोडवरून जात असताना स्थानिक रहिवासी सारडा यांच्या घराचे पत्रे उडाले. त्यानंतर उडालेले हे पत्रे थेट भाविकांच्या अंगावर पडल्याने तिघे जण जखमी झाले. यामध्ये अमित सुभाष आढे (वय २० वर्षे, रा. जोडमोहा, ता. कळम, जि. यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक रहिवासी सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता जखमी अमित आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात (Trimbakeshwar Civil Hospital) पोहोचवले. तेथे कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा वरपे, डॉ. श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार केले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यानंतर, पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी अमित आढे यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रशासन सतर्क; २४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश
या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य व आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः त्र्यंबकेश्वर परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, उपचारांवर आणि सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. हवामानाचा अंदाज पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तास सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (Dean) हे स्वतः जखमी तरुणाच्या उपचारांचे सनियंत्रण करत असून, वरिष्ठ प्रशासन त्यांच्या सतत संपर्कात आहे.




