
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नेवाशाचे वकील रियाज पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने नेवाशातील लष्करे टोळीतील सातजणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा शुक्रवार (दि. २८) रोजी सुनावली. तर खटल्यातील इतर ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ही माहिती दिली. २०१३ मध्ये नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारातच भरदुपारी हत्येची घटना घडली होती.
प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण व सादिक बशीर शेख या ७ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे व सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ जणांची खटल्यातून मुक्तता करण्यात आली.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. निकम यांनी काम पाहिले. त्यांना वकील परिमल फळे व पैरवी अधिकारी तथा पोलीस हवालदार महेश जोशी यांनी सहाय्य केले. वकिलाच्या हत्येची घटना राज्यभर गाजली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, नेवासा येथील वकील रियाज पठाण यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात अण्णा लष्करे खून प्रकरणात साक्ष दिली होती. या खटल्यात त्यांना सरकारी पक्षाने फितूर घोषित केले होते. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर अण्णा लष्करे टोळीतील आरोपींनी वकील रियाज पठाण हे फिर्यादीच्या बाजूने बोलले याचा राग धरून कट रचला. त्यावेळी पुण्यातील तुरुंगात असलेल्या सोपान गाढे व त्याच्या साथीदारांनी हा कट रचल्याचा पोलिसांचा दावा होता.
१६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी पावणेतीन-तीनच्या सुमारास वकील रियाज पठाण हे नेवासा येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व नोंदणी उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात एका लिंबाच्या झाडाखाली दस्त नोंदणीसाठी बसले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी प्रवीण खरचंद याने पाठीमागून येऊन पिस्तुलातून वकील पठाण यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी पठाण यांचे दोन्ही बाजूने हात घट्ट धरून ठेवले व इतर तीन आरोपींनी गोळ्या झाडण्यासाठी चिथावणी देत होते. या घटनेनंतर पठाण खाली कोसळले व आरोपींनी पळ काढला. मात्र नेवासा पोलिसांनी घटनास्थळीच प्रवीण खरचंद याला पिस्तुलासह पकडले. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी अशी पठाण व असिफ शेख यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पठाण यांना प्रथम नेवासा ग्रामीण रुग्णालयात, नंतर नगरमधील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असिफ पठाण यांच्या फिर्यादीनुसार नेवासे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
टोळीयुद्धाचा बचाव
खटल्यादरम्यान मुख्य आरोपी प्रवीण खरचंद याने आपण अल्पवयीन असल्याचा बनाव करत बचावाचा प्रयत्न केला, मात्र सरकारी वकील निकम यांनी तो खोडून काढला. न्यायालयाने तो मान्य केला. आरोपी मोहन लष्करे व सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण टोल नाक्यावर असल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज व ३ साक्षीदार सादर केले. मात्र सरकारी वकीलांच्या उलट तपासणीत हा बनवा उघडकीस आला आणि न्यायालयाने त्यांचा बचाव फेटाळला. पठाण टोळी व गाढे टोळी यांच्यातील वैमनस्यातून हत्या झाल्याचा बचाव पक्षाने युक्तिवाद केला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. खटला सुरू असतानाच आरोपी मोहन लष्करे हा फरार झाला. तो अद्याप सापडला नाही.
सरकारी पक्षाने २९ तर बचाव पक्षाने तपासले ३ साक्षीदार
या खटल्यात सरकारी पक्षाने २९ साक्षीदार तर बचाव पक्षाने ३ साक्षीदार तपासले. खटल्यादरम्यान मुख्य आरोपी प्रवीण खरचंद याने अज्ञान असल्याचा बनाव करत बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र, अॅड. निकम यांनी तो खोडून काढला. तसेच, आरोपी मोहन लष्करे व सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण टोल नाक्यावर असल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज व ३ साक्षीदार उभे केले होते. मात्र, सरकारी वकिलांच्या उलटतपासणीत हा बनाव उघडकीस आला आणि न्यायालयाने त्यांचा हा बचाव फेटाळून लावला. सर्व पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोस्टमार्टम आणि सीए अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रवीण खरचंद, मोहन लष्करे (फरार), रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे, पवन नरुल्ला, सचिन चव्हाण आणि सादिक शेख या ७जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर कटाचा थेट व भक्कम पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनिल उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ जणांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अॅड. उज्वल निकम यांना अॅड. परिमल फळे आणि पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार महेश जोशी यांनी मदत केली.




