सातपूर | प्रतिनिधी | Satpur
पावसाचा जोर वाढताच नाशिकमधील रस्त्यांच्या (Nashik Road) कामाचा दर्जा आणि महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सातपूर येथील शिवाजीनगर ते कार्बन नाका परिसरातील मुख्य रस्ता अचानक खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता खचल्यामुळे तब्बल १० ते १५ फूट खोल खड्डा पडला असून, यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाजवळ असलेल्या नाल्यालगतचा मुख्य रस्ता अचानक मोठ्या आवाजासह खचला. रस्ता खचला तेव्हा या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू होती. अचानक रस्ता खचल्याने वेगाने जाणारी काही वाहने या १० ते १५ फूट खोल खड्ड्यात अडकली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक अमोल पाटील (Amol Patil) यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. खड्ड्यात अडकलेली वाहने अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद केली आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिकच्या रस्त्यांची ही दुरवस्था झाल्याने सातपूर परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. करोडो रुपये खर्च करूनही रस्त्यांची अशी अवस्था होत असल्याने रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.




