Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : दानिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Nashik TCS Case : दानिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई नाका हद्दीतील (Mumbai Naka Area) टीसीएस कंपनीत (TCS Company) एका विवाहित कर्मचाऱ्याला लक्ष्य करत, त्याच्यावर विशिष्ट धर्माची टोपी परिधान करण्याची सक्ती करणे आणि धार्मिक श्रद्धांच्या विरोधात जाऊन मांसाहार करण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या दानिश शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.

- Advertisement -

पीडिताच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी (Suspected) पीडित तरुणाच्या जेवणावर गदा आणली नाही, तर त्याला एका विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासाठी देखील प्रवृत्त केले. कंपनीत काम करताना पीडिताबाबत खोटे अहवाल वरिष्ठांकडे पाठवून, इतर सहकाऱ्यांसमोर त्याचा वारंवार अपमान करण्यात आला. या मानसिक त्रासासोबतच त्याला गंभीर परिणामांच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या आरोपांची दखल घेत या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हटले.

या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नसून, कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांनीही लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी यांच्यासह असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी सध्या नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ आणि देवळाली कॅम्प पोलिसांत एक, असे एकूण नऊ गुन्हे या टोळीविरुद्ध नोंद आहेत. तर, संशयित निदा एजान खान गर्भवती असूनही तिच्यावरील आरोपांचे स्वरूप पाहता न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिलेले नाही. तिच्या अर्जावर २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तसेच, मुंबई नाका पोलिसांतील गुन्हा नोंद क्रमांक १६४ व १६५ तसेच १६९ व १७१ मध्ये संशयितांचे नाशिक जिल्हा न्यायालयात अद्याप जामीन अर्ज दाखल झालेले नाहीत. तर दानिश याने १६६ क्रमांकाच्या गुन्ह्यात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पहिली सुनावणी झाली. पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

कोठडी की दिलासा ?

गुन्ह्यातील सर्व कलमे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची आहेत आणि संशयिताची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तपास पूर्ण करण्यासाठी अटकेची गरज नसल्याचा युक्तिवाद दानिश शेखच्या वकिलांनी केला. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक संचालक किरण बेंडभर यांनी विरोध केला. “संशयितांविरुद्ध बलात्कार आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ यासारखे गंभीर आरोप असून, गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यांना सवलत देणे योग्य ठरणार नाही,” असा युक्तिवाद केला.

ठळक मुद्दे

  • प्रकरणातील एक संशयित निदा खान सध्या पसार आहे.
  • दानिश आणि तौसिफ यांच्या जामीन अर्जावर २ मे रोजी सुनावणी
  • मुंबई नाका पोलिसांतील गुन्ह्यांत अद्याप जामीन अर्ज दाखल नाहीत
  • पीडिताला संशयितांनी गंभीर परिणामांच्या धमक्या दिल्या

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ओपन बार’ आणि रात्रीचा गोंधळ; आदेशांची काही...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि बदलती जीवनशैली यासोबतच रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ('ओपन बार') करण्याचे प्रमाण...