नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि पवित्र तीर्थक्षेत्र (Trimbakeshwar Temple) असलेल्या त्र्यंबकेश्वरनगरीत सध्या व्हीआयपी दर्शन घोटाळ्याचे (VIP Darshan Scam) पाप ताजे असतानाच, आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या अगदी जवळ, काही बड्या धेंडांचे तब्बल पाचहून अधिक मद्यालये, बिअर बार आणि ताडीचा एक गुत्ता बिनबोभाटपणे सुरू आहे. अधिकृत वैध परवाना असल्याचे ढोंग करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांची ऐशीतैशी केली जात आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करतानाच मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर, माहेश्वरी धर्मशाळेसमोरच एका बड्या धेंडाचा दारूचा मोठा गुत्ता सुरू आहे. या जागेवर परवानगी मिळालीच कशी? आणि जरी मिळाली असली, तरी मद्य विक्रीची जागा, परिसर आणि अंतराचे नियम पूर्णतः पायदळी तुडवले गेल्याचे उघड होत आहे. तहसील कार्यालयापासून सुरू होणारा मद्यपींचा हैदोस आणि राडा दररोजचाच झाला असून यामुळे स्थानिक नागरिक (Citizem) महिला आणि लांबून येणारे भाविक हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण गंभीर प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला आहे. आमच्या हद्दीत अवैध गुत्ते नाहीत, असल्यास नावे कळवा, नाव गुप्त ठेवू असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केले असले, तरी डोळ्यांसमोर सुरू असणारे हे परवानाधारक बार मंदिराच्या इतक्या जवळ आलेच कसे, याचे उत्तर उत्पादन शुल्क विभागाला द्यावे लागणार आहे. सिंहस्थात लाखो भाविक, साधू-संत आणि महंत या पवित्र भूमीत येणार आहेत. त्यांनी येथे येऊन देवाच्या दर्शनाऐवजी हे मद्यालयांचे उच्छाद पहायचे का? असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
बुलडोझर पॅटर्न ?
सध्या देशात हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद केला जात असताना आणि अवैध व्यवसायांवर थेट बुलडोझरचा यूपी पॅटर्न चालवला जात असताना, त्र्यंबकेश्वरच्या या मद्यधुंद पापावर बुलडोझर चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी ही मद्यालये आणि बार त्र्यंबकेश्वरच्या हद्दीबाहेर हाकलण्याची आक्रमक भूमिका याआधीच घेतली आहे. आता जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय तोडगा काढतात का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय सांगते शासकीय नियमावली ?
- महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९५३ नुसार, नगरपरिषद किंवा नागरी क्षेत्रात कोणत्याही अधिकृत धार्मिक स्थळाच्या किंवा शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मद्यालय अथवा बारचे अंतर किमान ५० ते ७५ मीटर (पादचाऱ्यांच्या नेहमीच्या रस्त्याने) असणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हे अंतर १०० मीटर आहे.
- त्र्यंबकेश्वर हे अ-वर्ग तीर्थक्षेत्र असल्याने येथे संपूर्ण नगरपरिषद हद्दीतच मद्यविक्रीवर कडक प्रशासकीय निर्बंध अपेक्षित आहे. असे असताना मंदिराच्या हाकेच्या अंतरावर (२००-३०० मीटरवर) हे बार चालविण्याची सूट कुणाच्या मेहेरबानीने मिळाली?
- धर्मशाळा, बँक आणि मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य व्हीआयपी मार्गावर मद्यविक्रीचे निकष तपासण्याची तसदी विभागाने का घेतली नाही?
मुद्दे
- मंदिराच्या परिघात दारूबंदी आवश्यक असताना, अगदी दोनशे ते अडीचेशे मीटर अंतरावर बार
- सरकारमान्य देशी दारूची दोन दुकान
- चार परमिट रूम व बार
- एक ताडी विक्री दुकान
- वाहनतळावर आणि इतरत्र अवैध दारू विक्री
- दुसरा परमिट रूम वाहनतळाजवळ, अगदी मंदिराच्या समोर
- देशी दारू दुकान भाजी मंडईत, ते मंदिरापासून १०० मीटर अंतरावर
- एक देशी दारू दुकान नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर, तेथे वारंवार अपघात
- तहसील कार्यालयापासून दररोज मद्यपींचा राडा
- लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या आस्थेला प्रशासनाचाच तिलांजलीचा परवाना?




