त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
महाराष्ट्रातील नागा साधूंचे एकमेव कुंभमेळा क्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता ताणली गेली आहे. या ऐतिहासिक व पवित्र सोहळ्यास भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) या उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरु ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश होताच गोदावरीच्या उगमस्थानी, म्हणजेच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील पवित्र तीर्थराज कुशावर्त कुंडावर ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ होणार आहे. या मंगलसमयी होणाऱ्या ध्वजारोहणानेच कुंभमेळ्याची अधिकृत सुरुवात झाल्याचे संकेत संपूर्ण जगाला मिळतात.
प्रशासकीय नियोजन आणि व्हीआयपी पसंती
नाशिक येथील रामकुंडावर (Ramkund) आणि त्र्यंबकेश्वरी कुशावर्त कुंडावर एकाच वेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सोहळा होत असल्याने उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्त्वाच्या (VIP) व्यक्तींची विभागणी होण्याची शक्यता आहे. मात्र, नागा साधूंचे मुख्य केंद्र आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता अनेक प्रमुख मान्यवर आणि व्हीआयपी त्र्यंबकेश्वरलाच प्रथम प्राधान्य देतील असे मानले जात आहे.
धार्मिक व प्रशासकीय समन्वय
अखिल भारतीय आखाडा परिषद आणि स्थानिक पुरोहित संघ यांच्यात धार्मिक परंपरांचा आदर राखत सोहळा पार पाडण्यासाठी समन्वय साधला जात आहे. या सोहळ्याला आखाडा परिषदेचे साधू-महंत, पुरोहित संघाचे प्रतिनिधी आणि देश-विदेशातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. यापूर्वी कुंभमेळा आयुक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन मंदिर ट्रस्ट, नगरपालिका आणि पुरोहित संघासोबत (Purohit Sangh) सविस्तर चर्चा करून तयारीचा आढावा घेतला आहे.
सोहळ्याचे भव्यत्व आणखी वाढणार
कुंभमेळा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद (Trimbakeshwar Nagarparishad) या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आणि नियोजनाची सर्व पावले उचलत असून, राष्ट्रपतींच्या संभाव्य दौऱ्यामुळे या सोहळ्याचे भव्यत्व आणखी वाढणार आहे.




