नाशिक | Nashik
महायुतीतील (Mahayuti) विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून बहुचर्चित नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची (Nashik Vidhan Parishad Election) जागा शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला आली आहे. त्यानंतर शिंदे सेनेने येथून नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी महायुतीचे पारडे असल्याचे बघायला मिळत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, या जागेचा पेच सुटला असून, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाकडून (Shivsena UBT) निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते (Ganesh Gite) यांनी दोन अर्ज भरले असून, यात एक पक्षाकडून दाखल केला गेला आहे. तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गिते महायुतीचा धर्म पळून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात की उमेदवारी कायम ठेवतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
दरम्यान, भाजपने नाशिक आणि जळगाव (Nashik and Jalgaon) या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला होता. जळगावची जागा भाजपकडे होती त्यामुळे त्यांनी या जागेवर दावा सांगितला होता. तर नाशिकमध्ये भाजपची मतदार संख्या सर्वाधिक असल्याने या जागेवरही त्यांनी दावा केला होता. परंतु, महायुतीच्या जागावाटपात जळगावची जागा भाजपच्या (BJP) आणि नाशिकची जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या जागेचा पेच जरी सुटला असला तरी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा ११-४-२ फॉर्म्युला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रबादीला यश आले, तर ७जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विधान परिषदेच्या १४ जागांवर भाजपचे वर्चस्व होते. शिवसेनेने आपली ताकद असलेल्या आणि पारंपरिक जागा असलेल्या सहा जागांवर दावा केला होता. मात्र, सहापैकी चारच जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण) च्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा दावा ठोकण्यात आला होता आणि शिवसेनेला सुद्धा ती जागा मिळावी यासाठी पक्ष आग्रही होता. मात्र, त्या ठिकाणी रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम तोडगा निघाल्याचे समजते. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर- जालना या दोन जागांपैकी एक जागा भाजपला हवी होती. मात्र, या दोन्ही जागा शिवसेनेच्या पारंपरिक जागा असल्याने या जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिला. अंतिम टप्प्यात नाशिकची जागा शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगर-जालन्याची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाला. पुण्याच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणाऱ्या दोन जागांमध्ये पुण्याची जागा, त्यासोबतच कोकणातली जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली.




