Saturday, July 25, 2026
HomeनाशिकNashik ZP News : मुळेगावच्या महिलांचे 'रिकामे हंडे' घेऊन तीव्र आंदोलन; ...

Nashik ZP News : मुळेगावच्या महिलांचे ‘रिकामे हंडे’ घेऊन तीव्र आंदोलन; आंदोलनकर्त्यांनी रोखले सीओंचे वाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) मुळेगाव (Mulegaon) येथील भीषण पाणीटंचाई आणि दूषित पाण्याच्या प्रश्नावर भारतीय महिला फेडरेशन व ‘आयटक’ कामगार संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर (Zila Parishad) रिकामे हंडे घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गावात तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

मुळेगाव येथील महिलांना पिण्याच्या (Water) पाण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील विहिरींवर भटकंती करावी लागत आहे. या विहिरीतील दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पाणी भरण्याच्या गडबडीत आतापर्यंत ४ महिला व मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामुळे गावातील महिलांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा

आंदोलनादरम्यान संतप्त महिलांनी विहिरीतील दूषित पाण्याच्या बाटल्या थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दाखवत ‘हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा,’ अशी संतप्त मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आंदोलनकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवून प्रशासनाला जाब विचारला. अखेर, अर्ध्या तासात परत येऊन बैठक घेते आणि मार्ग काढते, असे आश्वासन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी गाडी जाऊ दिली. या आंदोलनात ‘आयटक’चे राजू देसले, प्राजक्ता कापडणे, मनोहर पगारे, लता जाधव, सोनाली जाधव, अनिता जाधव, सुनीता रामसे, मथुरा तिवारी, रमाबाई जाधव, लक्ष्मी पोटिंदे, पूजा पोटिंदे यांच्यासह मुळेगावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पाण्याच्या टाक्या बसविण्याचे आदेश

आंदोलनाच्या पवित्र्यानंतर त्र्यंबकेश्वरचे गट विकास अधिकारी व जल जीवन मिशनचे अभियंता यांच्या उपस्थितीत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक पार पडली.
बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंटेक्स टाक्यांची व्यवस्था: मुळेगावातील कायमस्वरूपी पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत गावातील राजवाडा व कोळीवाडा भागात तातडीने सिंटेक्स पाण्याच्या टाक्या बसवण्यात याव्यात. या टाक्यांमध्ये दररोज टँकरद्वारे पाणी भरले जाईल आणि पाणी भरल्यानंतर त्यावर स्थानिक महिलांची स्वाक्षरी (पावती) घेणे बंधनकारक असेल. गावातील विहिरीची स्वच्छता करून त्यातील गाळ त्वरित काढण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. पाण्याचा प्रश्न तात्काळ सुटला नाही आणि सिंटेक्स टाक्यांमध्ये नियमित पाणी पुरवठा न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...