Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारंगपंचमीसाठी ऐतिहासिक रहाडी ठरणार आकर्षण

रंगपंचमीसाठी ऐतिहासिक रहाडी ठरणार आकर्षण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रंगपंचमी ( Rangpanchami ) म्हणजे फूल टू धमाल, मजा मस्तीचा अनलिमिटेड डोस..! नाशिकमधील रंगपंचमीची मजा काही औरच असते. फाल्गुन कृष्ण पौर्णिमेपासून होळी ( Holi Festival ) उत्सवास सुरुवात होते. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजे रंगपंचमीला हा उत्सव समाप्त होतो. यानिमित्त नाशिकमध्ये पेशवेकालीन पारंपरिक सोहळा साजरा होतो. दोन वर्षांच्या करोना निर्बंधातून नाशिक आता मुक्त झाल्याने उद्या रंगपंचमी दणक्यात साजरी होणार आहे. शहरभर होणार्‍या रंगपंचमीत नाशिककर रंगणार आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये आज जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, काजीपुर्‍यातील दंडे हनुमान चौक, गाडगे महाराज पुलाखालील दिल्ली दरवाजा, पंचवटीतील शनी चौक आणि शिवाजी चौकातील साती आसरा मंदिरासमोरील रहाडीत रहाड रंंगोत्सव ( Rahad )साजरा होणार आहे. तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव प्रसिद्ध आहे. तिवंधा चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 10 फूट रूंद तर शनी चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 12 फूट रूंद आहे.

रहाड म्हणजे भला मोठा हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून सण साजरा केला जातो. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा रंगोत्सव साजरा झाला नाही. यावर्षी शहरातील करोना निर्बंध हटवल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार या ऐतिहासिक रंगोत्सवाला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिली आहे. जुने नाशिक गावठाणात पेशवेकाळात बांधलेल्या रहाडीवरून सतत वाहतूक सुरू असते. रंगोत्सवाच्या आधी या रहाडी साफसफाई, स्वच्छता, डागडुजी केली. त्यांची पूजा झाली. रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाईल. रहाडीभोवती तरुण गोल उभे राहून रहाडीतल्या पाण्यात जोरदार सूर मारतील. त्याला धप्पा म्हणतात. या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो लोकांची झुंबड उडते. ती यंदाही दिसणार आहे.

रहाडीतील रंगोत्सवासाठी पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवतात. रंगोत्सव संपल्यानंतर बल्ल्यांचा वापर करून ही रहाड बुजवली जाईल. पुन्हा पुढच्या रंगपंचमीला खुली होईल. नाशिकमध्ये जुन्या रहाडी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे जुन्या नाशिकच्या तिवंधा चौकातील हिंदमाता सेवक मंडळ येथील रहाड! येथील रहाडीचा रंग परंपरेने पिवळा बनवण्यात येतो.

यासाठी शेकडो पिवळी फुले व नैसर्गिक पावडरचा वापर केला जातो. प्रामुख्याने पिवळा झेंडू, बिजली, हातगा, गिलाडा, चाफा तर सुगंधासाठी मोगर्‍याच्या फुलांचा वापर केला जातो. पक्का रंग बनवण्यासाठी मोठ्या कढईत उकळवून घेतला जातो. नंतर सर्व मिश्रण गाळून रहाडीतील पाण्यात मिसळवण्यात येते. एकदा रहाडीत उडी मारली की निदान दोन दिवस तरी रंग जात नाही.

यात लिंबाचा पाला कुटून त्याचा अर्क तसेच अँटिसेप्टीक औषध पाण्यात टाकण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. रहाडीची शास्त्रोक्त पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते. हजारो नाशिककर रहाडीत उडी मारून रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात.

रहाडीत उडी मारण्याच्या पद्धतीला ‘धप्पा’ असे म्हणतात. अनेक लोकांची येथे गर्दी असते. मात्र आयोजकांकडून पुरेपूर काळजी घेण्यात येते. साधारणपणे 20 ते 25 कार्यकर्त्यांचे कडे रहाडीभोवती केले जाते. त्यामुळे एकमेकांवर आपटून अपघात होत नाही. कोणीही त्यात बुडू नये, यासाठी कार्यकर्ते खबरदारी घेण्यास तत्पर असतात. कोणी बुडताना दिसताच तत्काळ त्याला वर काढले जाते.

निलेश भालेराव, हिंदमाता सेवक मंडळ रहाडोत्सव

यंदा नाशिककरांची रंगपंचमी डीजेविना

पोलीस आयुक्त दीपक पांडेय ( Police Commissioner Deepak Pandey ) यांनी डीजेचा वापर करण्यास मनाई केल्याने यंदाची रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार असल्याने नाशिककरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात सर्व प्रमुखांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी रंगपंचमीला डिजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पारंपरिक वाद्यांचा वापर करुन रंगपंचमी साजरी करण्यास मुभा देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी डीजेला परवानगी नाकारली असली तरी रहाडीच्या ठिकाणी ढोल ताशांचा (आवाज घुमनार असल्याने थोड्या प्रमाणात का होईना नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या