पुणे | Pune
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) दोषी ठरविले आहे. या प्रकरणी पुणे न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावेळी वेळी आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि समाजमन हादरविणारे असून, हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा आल्याचे सांगण्यात आले होते.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. सोमवारी (दि. २९) आरोपीला जन्मठेप की फाशी? यावर शिक्कामोर्तब होणार होता. अखेर राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या ५८ दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकालावर शिक्कामोर्तब झाला. आज अंतिम निकाल वाचून दाखवताना न्यायाधीशांनी काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
न्यायाधीश काय म्हणाले?
शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी म्हटले, आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाच पर्याय सोडला नाही. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. पीडित मुलगी अवघी ३ वर्षांची होती. लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. कृत्य आरोपीनेच केल्याचे सिद्ध झाले आहे. हत्येनंतरही आरोपीने चिमुकलीवर अत्याचार सुरूच ठेवला. या प्रकरणात १५ दिवसांत आरोपपत्र दाखल झाले. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे.
रेअरेस्ट ऑफ रेअरे श्रेणीतील प्रकरण
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल वाचन करताना अत्यंत कडक शब्दांत आरोपीच्या कृत्याचा निषेध केला. “हा खटला ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ या श्रेणीत मोडतो. आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि चिमुरडीला दिलेला त्रास अमानुष होता. मुलीच्या अंगावर तब्बल १८ जखमा होत्या. मुलगी अत्यंत असहाय्य होती आणि स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. हत्येनंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला होता आणि तिला जिवंत राहण्याचा कोणताही पर्याय दिला नव्हता. त्यामुळे अशा नराधमाला वयाचा विचार करून माफी देण्यालायक काहीही नाही, असे न्यायालयाने म्हटले.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली.
पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर
न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने निकालात निघालेला पहिलाच खटला ठरला असून, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आरोपीला फाशी सुनावण्यात आली आहे.
राज्यातील सर्वात वेगवान निकाल
विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.




